महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा !
मुंबई – महाराष्ट्राच्या ३१ व्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आणि महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मोठे नेते उपस्थित रहातील.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर कोणती काळजी घ्यायची, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर या दिवशी होणार्या शपथविधीला उपस्थित रहाण्याच्या सूचनाही आमदारांना देण्यात आल्या आहेत. महायुती सरकारचा शपथविधी होत असतांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित रहातील. सुरक्षेच्या कारणास्तव पास मिळालेल्यांनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल.