विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांचा आदेश !
पुणे – सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, महाविद्यालय, तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना दुचाकी वाहन चालवतांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक केले आहे. याचे पालन सर्व संबंधितांनी करावे, असा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी दिला. नियम भंग करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करून त्यांच्या सेवा पुस्तकातही कारवाईची नोंद करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शिरस्त्राण न वापरणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील यामधील तरतुदींअन्वये संबंधित कार्यालय प्रमुखांनी शिस्तभंगविषयक प्राधिकार्यांच्या वतीने दंड वसुलीची कार्यवाही करावी, असे ही स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पुणे शहर, तसेच जिल्हा आणि विभागातील रस्ते अपघात, तसेच अपघातामुळे होणारे मृत्यू अल्प करण्यासाठीच्या उपाययोजना संदर्भात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत भारतात, तसेच महाराष्ट्रात रस्ते अपघातात वाहनचालकांच्या होणार्या मृत्यूंची संख्या लक्षणीय असल्याने यासंदर्भात करण्यात येणार्या उपाययोजनांची चर्चा करण्यात आली. वाहनचालकाने स्वतः, तसेच समवेत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणारे शिरस्त्राण वापरावे अशा सूचना न्यायमूर्ती श्री. सप्रे यांनी दिल्या असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकाअसा आदेश का द्यावा लागतो ? शासकीय अधिकारी-कर्मचारी स्वत:ला वेगळे समजतात का ? |