हिंदु धर्म हा जगाला मानवतेचा संदेश देणारा धर्म ! – शरद पोंक्षे, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक

श्री. शरद पोंक्षे

नवी मुंबई हिंदु संस्कृती ही आपली अस्मिता जागृत करणारी संस्कृती आहे. भारतावर इतकी आक्रमणे झाली, तरीही हिंदु कधी संपला नाही. हिंदु धर्म हा जगाला मानवतेचा संदेश देणारा धर्म असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक आणि व्याख्याते श्री. शरद पोंक्षे यांनी वाशी येथे केले. सावरकर विचार मंच, नवी मुंबई आयोजित ‘सावरकर विचार दर्शन’ या व्याख्यानाच्या प्रसंगी श्री. शरद पोंक्षे हे बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक श्री. रविंद्र नेने, आमदार गणेश नाईक, संस्कार भारतीचे कोकण प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठाणे विभाग सहसंयोजक कमलेश पटेल, सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष संतोष कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी सात्यकी सावरकर म्हणाले की, सध्या देशातील काही लोकांची समांतर व्यवस्था ही देश गिळंकृत करू शकते. यासाठी फळे, भाजी यांसह प्रत्येक गोष्ट आपल्याच बांधवांकडून खरेदी करा. देशाला धोकादायक व्यवस्थेवर कायद्यानुसार बुलडोझर चालवणे आवश्यक आहे. शासनाने नुकत्याच गोमातेच्या कल्याणकारी योजना घोषित केल्या असून सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संतोष कानडे म्हणाले की, राष्ट्रवादाविना भविष्यात पर्याय नाही. हा परखड विचार मांडून भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची ओळख करून देणारे आणि स्वातंत्र्यानंतर जागतिक राजकारणात भारताची भूमिका काय असावी, हे विचार मांडणारे सावरकर हे वैश्विक नेते होते.

शरद पोंक्षे म्हणाले की,…

. सावरकर हे गोरक्षणाच्या बाजूने होते. गाय मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिचे दूध आणि गोमूत्र यांसह प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी लाभदायक आहे. यासाठी गोरक्षणाची आवश्यकता आहे.

. हिंदी राष्ट्रवाद हा मुसलमानांचे लांगूलचालन करणारा होता. हिंदु राष्ट्रवाद सोडून हिंदी राष्ट्रवाद देशाचे भले करू शकत नाही, हे सावरकरांनी ओळखले होते. हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याविना रहाणार नाही, हे सावरकर यांनी वर्ष १९३७ मध्येच सांगितले होते. त्यांचे हे विधान १९४७ मध्ये खरे ठरले. हिंदी राष्ट्रवादाच्या प्रभावामुळे देशाची फाळणी झाली.

. इस्लाम धर्म न स्वीकारणार्‍या छत्रपती संभाजी राजांच्या देहाची औरंगजेबाने अक्षरशः चाळण केली; पण छत्रपतींनी शेवटपर्यंत हिंदु धर्म सोडला नाही. सध्याचे काही राजकारणी त्या औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुले वहातात; परंतु ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणणार्‍या कुणालाही याविषयी चीड आली नाही.

. राज्यभाषाकोष मराठीत करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे काम सावरकर यांनीच केले. मराठी भाषा टिकवण्यासाठी सध्याच्या शासनकर्त्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.