दिव्यांगांच्या आर्थिक साहाय्यासाठी आमदार बच्चू कडू समर्थकांचे आंदोलन !

आमदार बच्चू कडू समर्थकांचे आंदोलन

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे राज्यातील दिव्यांगांना सरकारने प्रत्येक महिन्याला पैसे द्यावेत. प्रती महिन्याला ६ सहस्र रुपये इतका निधी दिव्यांगांना मिळावा, यासाठी २५ सप्टेंबर या दिवशी मंत्रालयाच्या बाहेर ‘आकाशवाणी’ या आमदार निवासाच्या गच्चीवर आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आंदोलन केले.

‘आमच्या मागण्यांविषयी बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी येऊन माहिती द्यावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली. याविषयी बच्चू कडू यांनी याविषयी सरकारशी वार्तालाप चालू असल्याचे म्हटले. याविषयी आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘‘दिव्यांगांच्या विविध मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत आतापर्यंत ३-४ बैठका झाल्या आहेत. त्यांत प्रत्येक जिल्ह्यात ‘दिव्यांग भवन’ बांधणे, दिव्यांगांची नोकर भरती, दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्रे आदी विविध मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. याविषयी मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली; मात्र त्यांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. शासनाने कार्यवाही केली नाही, तर राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, तसेच मीसुद्धा दिव्यांग मंत्रालयाच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र देणार आहे.’’