३ ऑक्टोबरला घटस्थापना !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २५ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी येथे २४ सप्टेंबरपासून श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. सायंकाळी ७ वाजता श्री तुळजाभवानीदेवीचा अभिषेक होतो. त्यानंतर रात्री ८ वाजता १६ घरांतील मुख्य भोपे पुजारी श्री तुळजाभवानीदेवीला आरती ओवाळतात. श्री तुळजाभवानीदेवीच्या अंगावर भंडारा टाकला जातो. त्यानंतर श्री तुळजाभवानीदेवी निद्रेस जाते. या निद्रेला ‘मंचकी निद्रा’, असे म्हणतात.
ही निद्रा महिषासुरासमवेत युद्ध करण्यापूर्वी श्री तुळजाभवानीदेवीला दिली जाते. संपूर्ण जगात आणि भारतात अशी एकच चलमूर्ती आहे की, जी वर्षातून २१ दिवस पलंगावर जाऊन निद्रा घेते. ही परंपरा केवळ तुळजापूर येथे आहे. या निद्रेचा कालावधी अष्टमी ते प्रतिपदेपर्यंत असतो. ९ दिवसांची मंचकी निद्रा संपल्यानंतर ३ ऑक्टोबर या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे, तर दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत् घटस्थापना केली जाणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तुळजाभवानीदेवीची विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहे.