‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. ध्यानमंदिरात देवतांचे सगुण तत्त्व असणे आणि सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ असल्याने साधिका मार्गिकेत चालत असतांना तिचा नामजप भावपूर्ण होणे
सौ. संगीता चौधरी : मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना काही वेळा माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होत नाही. तेव्हा माझ्या मनात पुष्कळ विचार येतात. एकदा मी ध्वनीचित्रीकरण कक्षात जाण्याच्या मार्गिकेतून चालतांना नामजप करत होते. तेव्हा मला जाणवले, ‘माझा नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने होत आहे. तेथे एक मोठी पोकळी आहे. मी नामजप करत पोकळीच्या आत जात आहे आणि पोकळी मला खेचून घेत आहे. तेथील लादीवरून चालत असतांना मी अनुमाने १ फूट उंचीवरून चालत आहे.’ ध्यानमंदिरात देवतांची चित्रे आहेत. तिथे पूजा होते आणि साधक नामजप करतात, तरीही ध्यानमंदिरापेक्षा मोकळ्या जागेत मला वेगळे का जाणवले ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : छान ! ध्यानमंदिरात सगुण तत्त्व आहे आणि पोकळीत निर्गुण तत्त्व आहे. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ आहे; म्हणून ध्यानमंदिरात बसून नामजप चांगला होण्याऐवजी मार्गिकेतून चालत नामजप करतांना तुम्हाला चांगले वाटले.
२. साधकांना ‘स्वतःची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे वाटायला हवे आणि त्यासाठी साधकांनी प्रयत्न करायला हवेत !
सौ. संगीता चौधरी : माझ्या मनात काही वेळा स्वतःच्या प्रगतीचे विचार येतात. ‘माझी प्रगती व्हावी’, असे वाटते. तेव्हा ‘ही माझी स्वेच्छा आहे’, असेही वाटते. योग्य कसे असावे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : असेच वाटायला हवे. ‘ईश्वरप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे’, याला तुम्ही स्वेच्छा म्हणणार का ? ही चांगली स्वेच्छा आहे.’
– सौ. संगीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.