अधिकाधिक जागा भाड्याने देऊन एस्.टी. विकासासाठी निधी उभारू ! – भरतशेठ गोगावले

मुंबई – एस्.टी.च्या जागा भाड्याने देण्याच्या कराराचा कालावधी ६० वर्षे करण्याचा राज्यशासनाचा निर्णय स्वागतार्थ आहे. येत्या काळात ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या योजनेला व्यापक स्वरूप देऊन एस्.टी.च्या अधिकाधिक जागा भाडेतत्त्वावर देऊन एस्.टी.च्या विकासाकरता चांगला निधी उभारू, असे प्रतिपादन एस्.टी. महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांनी केले.

या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या. यातून एस्.टी.ला उत्पन्नाचा चांगला मार्ग आहे; मात्र भाडेकराराचा ३० वर्षांचा कालावधी अत्यंत अल्प असल्यामुळे मागील २२ वर्षांत याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. भाडेकराराचा कालावधी ६० वर्षे केल्याचा एस्.टी.ला चांगला लाभ होईल. सध्या महामंडळाकडे असलेल्या १ सहस्र ५०० हेक्टर भूमीचा विकास या माध्यमातून होऊ शकतो. यासाठी १०० हून अधिक प्रकल्प या योजनेअंतर्गत विकसित करण्याचा आराखडा महामंडळ स्तरावर आखला जात आहे. लवकरच यांपैकी २० व्यवहार्य प्रकल्पाच्या निविदा निघणार आहेत. तिकीट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नासह ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या योजनेतून एस्.टी.ला कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होईल. एस्.टी.ची बसस्थानके, आगारे आणि कार्यालये यांच्या इमारतील नव्याने बांधण्याचे काम  शासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे एस्.टी. महामंडळाला भविष्यात चांगले दिवस येतील. यामुळे प्रवाशांना चांगल्या बस, विकसित बसस्थानके आणि स्वच्छ अन् सुंदर प्रसाधनगृहे देण्याचा माझा प्रयत्न राहील.’’