चिंतामणीनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती आणखीन वाढवा ! – रेल्वे प्रशासनाकडे मागणी

चिंतामणीनगर येथील उड्डाणपुलाच्या कामाविषयी चर्चा करतांना श्री. नितीन शिंदे (मध्यभागी) आणि प्रशासकीय अधिकारी

सांगली, १२ सप्टेंबर (वार्ता.) – चिंतामणीनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती आणखीन वाढवा, अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदेसह व्यापारी, उद्योजक यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या वेळी सर्वश्री हनुमंत नरळे, गणेश सूर्यवंशी, अनिरुद्ध कुंभार, नंदकुमार पवार, आकाश काळेल आदी उपस्थित होते.

१. ‘चिंतामणीनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने करून १० सप्टेंबरपूर्वी एकेरी वाहतूक चालू करून ३० सप्टेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करू’, असे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने चाबूकफोड आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांना दिले होते.

२. त्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर या दिवशी पुलावरून एकेरी वाहतूक चालू होते का ? कामाची स्थिती काय आहे ? याची माजी आमदार श्री. नितीन शिंदे, व्यापार्‍यांचे नेते श्री. प्रदीप बोथरा, उद्योजक श्री. मनोज साळुंखे, रेल्वे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्या

सौ. उत्कर्षां कसबेकर, आर्.पी.एफ्. विभागाचे प्रमुख श्री. पाल यांच्या समवेत पाहणी केली.

३. या वेळी वरिष्ठ अभियंत्या सौ. उत्कर्षां कसबेकर म्हणाल्या की, मुरूम उपलब्ध न झाल्यामुळे भरावाचे काम शिल्लक राहिले आहे. ते काम करण्यासाठी आम्हाला ८-१० दिवस द्यावेत.

४. या वेळी व्यापार्‍यांचे नेते श्री. प्रदीप बोथरा म्हणाले की, रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम आताच्या गतीने केले असते, तर पुलाचे काम कधीच पूर्ण झाले असते.

५. माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले की, दिवाळी आणि दसरा हे २ सण तोंडावर आले आहेत. ३० सप्टेंबरपूर्वी पुलाचे काम पूर्ण करा.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?