पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

पुणे जिल्ह्यातील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी २० ते २६ मार्च २०२३ या कालावधीत केलेले समष्टी साधनेचे विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न पुढे देत आहोत.

श्री. महेश पाठक

१. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘सामूहिक गुढी उभारणे’ या उपक्रमात धर्मप्रेमींचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग

अ. हडपसर येथे सामूहिक गुढी उभारण्याविषयी धर्मप्रेमींना सांगितल्यावर सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन सिद्धता केली. त्यांनी समितीच्या साधकांच्या संपर्कात राहून त्याविषयी विचारून घेतले. धर्मशिक्षणवर्गातील १५ धर्मप्रेमींनी सकाळी लवकर आपापल्या घरची गुढी उभारून सामूहिक गुढी उभारली. उपस्थित सर्वांचा धर्मकार्य करण्याचा निश्चय दृढ झाल्याचे जाणवले.

आ. हडपसर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधीरचंद्र जगताप यांनी ‘समितीचा हा अतिशय चांगला उपक्रम असून यापुढेही असेच उपक्रम राबवायला हवेत आणि त्यामध्ये आमचाही सक्रीय सहभाग असेल’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

इ. हडपसर येथील धर्मप्रेमी श्री. उमेश खडसरे प्रतिदिन अर्धा घंटा नामजप करतात. त्यांचे पाहून त्यांची लहान मुलगीही आता नियमित नामजप करू लागली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या महिला साधिकांना प्रसार करतांना पाहून ‘आपणही तळमळीने प्रसार कार्यात सहभागी व्हायला हवे’, अशी मला नेहमी प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेनेच मी पुढे उत्साहाने कार्य करतो’, अशी प्रतिक्रिया श्री. उमेश खडसरे यांनी व्यक्त केली.

ई. धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमी श्री. आकाश जाधव, श्री. विशाल सुरवसे, श्री. प्रतीक चव्हाण यांनी ‘गुढी न उभारता भगवा ध्वज उभारावा’, असे समाजात सांगणार्‍या एका व्यक्तीला दूरध्वनीवरून संपर्क केला. त्या व्यक्तीचा प्रतिसाद अल्प मिळाल्याने ते तिला प्रत्यक्ष भेटले. त्यांनी नम्रपणे आणि पुराव्यासह त्या व्यक्तीचे प्रबोधन केले. तेव्हा त्या व्यक्तीने प्रसारित केलेल्या पोस्ट्स मागे घेतल्या.

उ. नारायणपूर येथील धर्मप्रेमींनी एक दिवस आधी एकत्र येऊन गुढी उभारण्याचे नियोजन केले. ज्या ठिकाणी गुढी उभारण्यात येणार आहे, तेथे महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छता केली. सरपंच श्री. चंद्रकांत बोरकर यांच्या उपस्थितीत सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली.

ऊ. ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गाला जोडणारे ‘दिवे’ गावातील श्री. अण्णा गायकवाड हे वारकरी संप्रदायाचे आहेत. एक दिवस आधी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मिळून संपूर्ण मंदिराची स्वच्छता केली. त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील सरपंच, उपसरपंच, अन्य धर्मप्रेमी आणि वारकरी यांना बोलावून आणले. गायकवाड यांनी हरिनामाचा जयघोष करत हिंदु राष्ट्राची गुढी उभारून उपस्थित सर्वांना समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येण्याचे आवाहन केले.

ए. ‘हिवरे’ गावातील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी ‘गुढी भावपूर्ण उभारली आणि नामजप केला’, हे उत्साहाने सांगितले. धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या महिलांनी सांगितले, ‘या वेळी गुढीपाडवा साजरा करतांना पुष्कळ आनंद वाटला. आम्हाला देवाचे नाव सतत घेतल्यावर काहीतरी वेगळे चांगले वाटत आहे.’

ऐ. ‘निरा’ येथील धर्मशिक्षणवर्गांतील धर्मप्रेमींनी मोठ्या उत्साहात हिंदु राष्ट्राची गुढी उभारून हिंदूंचे नववर्ष साजरे केले. या वेळी निरा गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हिंदु राष्ट्राची शपथ घेऊन सर्वांनी मोठ्या उत्साहाने घोषणा दिल्या.

ओ. ‘नांदेड गाव’, सिंहगड रस्ता येथे गुढी पाडव्यानिमित्त सकल हिंदु समाज आयोजित शोभायात्रेत सामूहिक गुढी उभारण्यात आली आणि हिंदु राष्ट्राची शपथ घेण्यात आली. शपथ घेण्यासाठी २०० पेक्षा अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी ‘‘हिंदु राष्ट्राची शपथ घेतली ते चांगले झाले. त्यामुळे आपल्या ध्येयाची आपल्याला जाणीव रहाते’’, अशी प्रतिक्रिया एका धर्मप्रेमीने व्यक्त केली.

औ. ‘पारगाव (सालू मालू)’ येथे एक वर्ष गावात कोणीच गुढी उभारली नव्हती. सर्वांनी केवळ ध्वज उभारले होते. ‘आता पुन्हा सर्वांनी गुढी उभारायला आरंभ केला आहे’, असे धर्मशिक्षणवर्गात समजले. त्या वेळी वर्गात ‘गुढीपाडवा का आणि कसा साजरा करावा?, तसेच गुढीपाडवा निमित्त होणारे अपप्रचार’ हा विषय समजावून सांगितल्यानंतर सर्व धर्मप्रेमींमध्ये गुढीपाडवा साजरा करण्याविषयी उत्साह निर्माण झाला. वर्गात सामूहिक गुढी उभारण्याविषयी चर्चा झाल्यावर सर्व धर्मप्रेमींनी त्यासाठी सिद्धता दाखवली. पारगाव हे गाव शहरापासून दूर असल्याने मला तेथे प्रत्यक्ष जाणे शक्य नव्हते; म्हणून मी पुढाकार घेणार्‍या दोन धर्मप्रेमींच्या संपर्कात राहून समन्वय करत होतो. या उपक्रमाचे दायित्व धर्मप्रेमी श्री. गणेश ताकवणे यांनी घेतले होते. यातून श्री. गणेश ताकवणे यांच्यातील नेतृत्व, संघटन कौशल्य, कार्याची तळमळ, पुढाकार घेणे, सकारात्मक रहाणे इत्यादी गुण शिकायला मिळाले. ‘या निमित्ताने सामूहिक गुढी उभारण्यास आरंभ झाला आणि सेवेतून आनंद मिळाला’, असे गणेशदादांनी सांगितले. समिती सेवक उपस्थित नसतांनाही धर्मप्रेमींनी हा उपक्रम उत्स्फूर्तपणे आणि नियोजनबद्ध राबवला, हे विशेष जाणवले. ‘अल्प कालावधीमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर धर्मप्रेमी प्रयत्न करत आहेत’, हे पाहून मला ‘हिंदु राष्ट्र स्थापन झाले आहे आणि सर्व जण ईश्वरी राज्याचे स्वागत करत आहेत’, असेच जाणवले.

अं. ‘आळंदेवाडी’ येथील गव्हाणे कुटुंबीय धर्मशिक्षणवर्गात सहभागी होतात. वर्गात सामूहिक गुढी उभारण्याविषयी चर्चा झाल्यावर सौ. मनीषा गव्हाणे, कु. दिव्या गव्हाणे, श्री. विजय गव्हाणे यांनी त्वरित ‘काय काय करायचे ?’ ते समजून घेतले. त्या सर्वांनी वर्गातील अन्य निरोप देणे, साहित्याची सिद्धता करणे इत्यादी सर्व सेवा पुढाकार घेऊन केल्या.

क. आळंदेवाडी येथील सौ. मनीषा गव्हाणे यांची साधनेची, तसेच सेवेची तळमळ असते. सेवेचे कोणतेही सूत्र सांगितले, तरी त्या सकारात्मक राहून प्रामाणिकपणे कृती करण्याचा प्रयत्न करतात. ‘‘साधनेविना पर्याय नाही. साधनेनेच स्थिर रहाता येत आहे आणि देव काही अल्प पडू देत नाही. आवश्यक ते देव देतो’’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘‘या धर्मशिक्षणवर्गामुळे आणि साधनेमुळे आमच्या कुटुंबातील सर्वांच्या वागण्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे’’, असेही त्यांनी सांगितले.

२. बलीदान मासाच्या निमित्ताने धर्मप्रेमींनी केलेले प्रयत्न

हिवरे, नारायणपूर, डाळींब या गावांमध्ये ‘बलीदान मासा’निमित्त प्रवचन घेतल्यानंतर धर्मशिक्षणवर्गासाठी मागणी आली.

३. श्रीरामनवमी निमित्ताने सामूहिक नामजप आणि ‘रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पठण’ या उपक्रमांमध्ये धर्मप्रेमींनी केलेले प्रयत्न

द्वारका सोसायटी, शिरवळ, तसेच आळंदेवाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी गुढीपाडवा ते श्रीरामनवमीपर्यंत सामूहिक नामजप केला.

– श्री. महेश पाठक, हिंदु जनजागृती समिती (वय ४३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे.

धर्मशिक्षणवर्गातील वैशिष्ट्यपूर्ण घटना

१. जन्मत: बोलता आणि ऐकता येत नसलेल्या मुलीला धर्मशिक्षणवर्गातील विषय आपोआप समजून तिला आनंद मिळणे : हिवरे येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या कु. दीपाली गायकवाड (वय १९ वर्षे) हिला जन्मत: बोलता आणि ऐकता येत नाही.; परंतु ती तिच्या आईसह वर्गात येते. वर्गात होणारे सर्व विषय संपूर्ण लक्ष देऊन ऐकते. तेव्हा तिच्याकडे पाहून तिला विषय समजत आहे’, असे जाणवते. तिच्या आईने सांगितले, ‘‘तिला बाहेर कुठेही जायला आवडत नाही; पण ती प्रत्येक सोमवारी न चुकता धर्मशिक्षणवर्गाला येत असते. वर्गात यायला तिला पुष्कळ आवडते.’’ तेव्हा वर्गसेवकाने ‘तिला वर्गातला विषय कसा कळतो ?’ असे विचारल्यावर तिची आई म्हणाली की, तिला सर्व आपोआप समजते आणि जे समजत नाही, ते ती विचारून घेते. त्या वेळी तिची आई तिला सांकेतिक भाषेत सांगते. दीपालीने स्वत:हून सांकेतिक भाषेत सांगितले की, ‘‘धर्मशिक्षणवर्गाला आल्यावर पुष्कळ आनंद वाटतो. मी प्रतिदिन वर्गाला नियमित येणार.’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली. ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची दैवी कृपा आहे. गुरुदेवांचे तत्त्व आणि चैतन्य मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. ‘या ताईला गुरुमाऊलीच सुक्ष्मातून सर्वकाही सांगत आहेत आणि तिला ते आत्मसात होत आहे’, असे मला जाणवले.

२. कात्रज वर्गातील महिलांनी व्यष्टी साधना पूर्ण होत नसल्याने प्रायश्चित्त घेतले. नामजप झाला नाही; म्हणून कुणी चहा घेतला नाही, तर कुणी भात खाल्ला नाही. सर्वांनी मनापासून साधनेचे प्रयत्न केले.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक