विविध राज्यांत असलेल्या या जागृत गणेश मंदिरांना तुम्ही भेट दिली आहे का ?

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे असले, तरी या दोन्ही राज्यांबाहेरही श्री गणेशाचे पूजन मोठ्या प्रमाणात होते. देशभरात श्री गणेशाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्या त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा ही मंदिरे दिमाखाने मिरवतात. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध राज्यांतील काही प्राचीन गणेश मंदिरांचा इतिहास जाणून घेऊया.

पूजन केलेली धुंडीराज गणपतीची मूर्ती

सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर अनेक आघात होत आहेत. ‘सर्वांना अभय प्रदान करणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे’, हाच या स्थितीतून बाहेर पडण्यासाठीचा एकमेव उपाय आहे. श्री गणेश विघ्नहर्ता आणि कार्यसिद्धीदाता आहे. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि रामराज्याप्रमाणे असलेले हिंदु राष्ट्र लवकर स्थापन व्हावे’, यासाठी आपण श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया !

१. कर्नाटकमधील कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील श्री महागणपति !

कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील श्री महागणपति

कर्नाटक राज्यात उडुपी जिल्ह्यात कुंभाशी येथे श्री आनेगुड्डे महागणपति मंदिर आहे. येथील श्री महागणपतीची मूर्ती अखंड पाषाणातून बनवलेली १२ फूट उंचीची आहे. श्री गणेशाला ५ किलो सोन्याचा मुखवटा आहे. मूर्तीवरील अन्य कवच चांदीने बनवलेले आहे. कन्नड भाषेत ‘आने’ म्हणजे ‘हत्ती’ आणि ‘गुड्डे’ म्हणजे ‘टेकडी’, ‘टेकडीवर वास्तव्यास असलेला गजानन’, या अर्थाने त्या गणपतीला ‘आनेगुड्डे श्री महागणपति’, असेही संबोधले जाते. हा गणपति अत्यंत जागृत आहे. असे म्हटले जाते की, कुंभासुराचा वध करण्यासाठी येथेच श्री गणेशाने भीमाला तलवार दिली.

२. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील स्वयंभू त्रिनेत्र श्री गणेश !

सवाई माधोपूर येथील स्वयंभू त्रिनेत्र श्री गणेश

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे रणथंभोर किल्ल्यात एक स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू त्रिनेत्र गणपति प्रकट झाला आहे. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाच्या काळात हा त्रिनेत्र गणेश प्रथम प्रकट झाल्याचे तेथील पुरोहित सांगतात. त्रिनेत्र गणपतीचे हे पहिले मंदिर आहे. पंचक्रोशीतील भक्त कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देतात. असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने त्याच्या विवाहाचे पहिले निमंत्रण याच गणपतीला दिले होते. त्यानंतरच विवाहादी मंगलकार्यांमध्ये श्री गणेशाला निमंत्रण देण्याची परंपरा चालू झाली.

३. श्रीकृष्णाने पूजलेला गणपतिपुरा (गुजरात) येथील स्वयंभू श्री गणेश !

गणपतिपुरा (गुजरात) येथील स्वयंभू श्री गणेश

‘गुजरात राज्याची राजधानी कर्णावतीपासून ५० कि.मी. दूर अंतरावर ‘गणपतिपुरा’ नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी गुजरातमधील सर्वांत प्राचीन असे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. ५,५०० वर्षांपूर्वी श्रीकृष्ण आणि पांडव यांनी या गणपतीचे पूजन केले होते. ‘या गणपतीची पूजा केल्यानंतर श्रीकृष्णाने द्वारकेत राहून अनेक वर्षे राज्य केले’, असे म्हटले जाते. या गणपतीचे नाव ‘सिद्धिविनायक’ आहे. भगवान श्रीकृष्ण या गणेशाची पूजा करायचे. त्यामुळे या स्थानाला पूर्वी ‘गणेश द्वारका’ असे म्हटले जायचे. ‘जेव्हा पांडव श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला जायचे, तेव्हा प्रत्येक वेळी या गणपतीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे’, अशी आख्यायिका सांगितली जाते.

४. राजस्थानमधील जयपूर येथील मोती डुंगरी गणेश मंदिर !

राजस्थानमध्ये प्रसिद्ध असलेले आणि अत्यंत जागृत असलेले मोती डुंगरी मंदिर वर्ष १७६१ मध्ये बांधण्यात आले. किल्ला आणि टेकड्या यांनी वेढलेले हे जयपूरच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. ही मूर्ती अनुमाने ५०० वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. या मंदिराचे बांधकाम संगमरवरी आहे. ते नागरी शैलीत बांधलेले आहे. महाशिवरात्रीला मंदिरात शिवलिंगाची पूजाही भक्त करतात. हे मंदिर जयपूर शहरापासून अनुमाने ६ कि.मी. अंतरावर आहे.

५. काशीक्षेत्री विराजमान झालेला श्री धुंडीराज विनायक !

काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची प्रदक्षिणा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे. काशी विश्वनाथाच्या प्रवेशद्वाराशीच हा श्री गणेश विराजमान आहे. स्कंद पुराणातील काशीखंडात काशी क्षेत्राचे माहात्म्य वर्णिले आहे. श्री गणेश ५६ रूपांत काशीक्षेत्री विराजमान झाले. श्री धुंडीराज विनायक हे भगवान विश्वनाथांच्या प्रवेशद्वाराशीच स्थापित झाले. काशीविश्वनाथ हे भक्तांना पावणारे आहेतच; पण त्यांचे काशीक्षेत्री आगमन होण्यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्तवत्सल आहेत. ‘श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही’, असे या गणेशाचे महात्म्य आहे.

६. सिक्कीममधील जागृत मंदिर श्री गणेश टोक !

कांचनगंगा पर्वतांच्या भव्य दृश्यांसह डोंगराच्या माथ्यावर वसलेले हे गंगटोकमधील एक सुंदर मंदिर आहे. पर्यटक आणि यात्रेकरू गणेश टोकाला अतिशय पवित्र स्थान मानतात. वर्ष १९५२ मध्ये भारत सरकारचे एक उच्चपदस्थ अधिकारी श्री. अप्पाजी पंत जे मूळचे महाराष्ट्रातील होते, त्यांची सिक्कीम राज्यात नियुक्ती झाली होती. श्री. अप्पाजी पंत हे धार्मिक प्रवृत्तीचे आणि देवाचे भक्त होते. वर्ष १९५३ मध्ये त्यांना एक स्वप्नदृष्टांत झाला होता. स्वप्नात त्यांना गुहेत असलेल्या श्री गणेशाचे दर्शन झाले. त्यांनी या स्थानाचा शोध घेतला असता त्यांना आताच्या ‘गणेश टोक’ या ठिकाणी असलेल्या गुहेमध्ये श्री गणेशाचे साक्षात् दर्शन झाले. त्या गुहेच्या ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकांना श्री गणेशाच्या पूजेची प्रथा घालून दिली. गुहेत जाण्यासाठी फारच अल्प जागा होती. वर्ष २००७ मध्ये भारतीय सैन्याने गुहेच्या ठिकाणी एका मंदिराची निर्मिती करून त्यामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. येथे ५० पायर्‍या चढून दर्शनासाठी जावे लागते.

७. कलामस्सेरी महागणपती मंदिर, केरळ

हे मंदिर केरळमध्ये आहे. या मंदिरात सुब्रमण्यम् आणि नवग्रहांसारख्या मूर्ती आहेत. या मंदिरात भगवान शिव, देवी पार्वती आणि प्रभु श्रीरामाची मूर्तीही आढळते. हे मंदिर वर्ष १९८० च्या दशकात बांधण्यात आले आहे. रघुनाथ मेनन यांनी हे मंदिर बांधले आहे. अष्टद्राव्य महा गणपती हवानात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. मल्याळम् दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिरात आनयूट्टूचेही आयोजन करण्यात येते. येथे दर चार वर्षांनी गजपूजा होते.

७. इंदूर (मध्यप्रदेश) येथील श्री खजराना गणेश मंदिर !

मध्यप्रदेशातील इंदूर येथील खजराना मंदिराला विशेष महत्त्व आहे. हे मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. खजराना मंदिरात श्री गणेशाची ३ फुटी मूर्ती आहे. ही मूर्ती जवळच्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. सरकारने हे मंदिर कह्यात घेतले आहे. या मंदिराचे व्यवस्थापन भट्ट कुटुंबाद्वारे केले जाते. असे मानले जाते की, मूर्तीचे औरंगजेबापासून संरक्षण करण्यासाठी मूर्ती विहिरीत लपवली गेली आणि वर्ष १७३५ मध्ये ती विहिरीतून बाहेर काढण्यात आली. वर्ष १७३५ मध्ये मराठ्यांच्या होळकर राजघराण्यातील अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली. गेल्या काही वर्षांत या मंदिराचा पुष्कळ विकास झाला आहे. एका छोट्या झोपडीपासून ते आता एक मोठे मंदिर झाले आहे. सोने, हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांची मंदिराला नियमित देणगी दिली जाते. गर्भगृहाची बाह्य भिंत आणि इतर भिंती चांदीने मढवलेल्या आहेत. त्यावर विविध उत्सव कोरण्यात आले आहेत.

८. तमिळनाडूतील गजाननाच्या प्रमुख ३ मंदिरांपैकी पहिले स्वयंभू श्री गजानन मंदिर !

‘पिळ्ळैयारपट्टी (पिळ्ळैयार म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाचे मंदिर हे तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख ३ मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे. हे मंदिर १ सहस्र वर्षांपूर्वी पल्लव राजांच्या काळात बांधले गेले आहे. गजाननाचा आकार डोंगरातूनच उत्पन्न झाला आहे. मंदिरामागे गेल्यास या डोंगराचे आपल्याला दर्शन घडते. गजाननाच्या स्वयंभू आकाराच्या रहस्याचा कालखंड कुणालाही ठाऊक नाही. या गजाननाच्या उजव्या हातात शिवपिंडी धरलेली आढळून येते. सामान्यतः श्री गणेशाला ४ हात असतात. या स्वयंभू मूर्तीला मात्र २ हात आहेत. मूर्तीमागे डोंगरातच एक शिवपिंडीही आपोआप सिद्ध झालेली आहे; परंतु या शिवपिंडीचे आपल्याला दर्शन घेता येणे शक्य होत नाही.

९. कर्नाटकातील इडगुंजी येथील श्री महागणपति !

इडगुंजी मंदिरातील मुख्य मूर्ती चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. श्री गणेशाची मूर्ती ३३ इंच उंच आणि २३ इंच रुंद आहे. ही द्विभुजा श्री गणेशमूर्ती पाषाणावर उभी आहे. श्री गणेशाच्या उजव्या हातात कमळ आहे आणि दुसर्‍या हातात मोदक आहे.सामान्यतः श्री गणेशाचे वाहन मूषक (उंदीर) प्रत्येक मूर्ती आणि प्रतिमा यांत दिसतोच. या ठिकाणी मात्र मूषकाची मूर्ती नाही.

१०. कलामस्सेरी महागणपती मंदिर, केरळ

हे मंदिर केरळमध्ये आहे. या मंदिरात सुब्रमण्यम आणि नवग्रहांसारख्या मूर्ती आहेत. या मंदिरात तुम्हाला भगवान शिव, देवी पार्वती आणि प्रभु श्रीरामाची मूर्तीही आढळेल. हे मंदिर वर्ष १९८० च्या दशकात बांधण्यात आले आहे. रघुनाथ मेनन यांनी हे मंदिर बांधले आहे. अष्टद्राव्य महा गणपती हवानात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. मल्याळम दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिरात आनयूट्टूचेही आयोजन करण्यात येते. येथे दर चार वर्षांनी गजपूजा होते.

(साभार : विविध संकेतस्थळे)