श्री गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

  • रतलाम (मध्‍यप्रदेश) येथील घटना

  • संतप्‍त जमावाने केली वाहनांची तोडफोड

प्रतिकात्मक छायाचित्र

रतलाम (मध्‍यप्रदेश) – येथील मोचीपुरा भागात श्री गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्‍यात आली. यानंतर संतप्‍त हिंदूंनी पोलीस ठाण्‍याला घेराव घालत रस्‍ताबंद आंदोलन केले. त्‍यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी केली. तसेच जमावाकडून दगडफेक करणार्‍यांच्‍या भागात जाऊन वाहनांची तोडफोड करण्‍यात आली. त्‍यांना रोखण्‍यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या आणि परिस्‍थिती नियंत्रणात आणली.

१. येथील अंकला परिसरातील मोचीपुरा भागातून श्री गणेशमूर्तीची मिरवणूक निघाली होती. ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून श्री गणेशमूर्ती नेली जात होती. रात्री साडेनऊच्‍या सुमारास त्‍यावर दगडफेक करण्‍यात आली. या दगडफेकीत काही मुले घायाळ झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

२. श्री गणेशमूर्ती प्रतिष्‍ठापनास्‍थळी नेल्‍यानंतर संतप्‍त तरुणांचा जमाव स्‍टेशन रोड पोलीस ठाण्‍यात पोचला. तेथे घोषणाबाजी करत दोषींवर तात्‍काळ कडक कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी केली. पोलीस ठाण्‍यासमोर रस्‍ता बंद आंदोलन करण्‍यात आले.

३. यानंतर येथे हिंदू जागरण मंचचे नेते राजेश कटारिया, भाजप नेते निर्मल कटारिया यांच्‍यासह अनेक नेते घटनास्‍थळी पोचले. पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी पोचून आंदोलकांशी बोलून त्‍यांना शांत करण्‍याचा प्रयत्न केला.

४. आंदोलकांच्‍या मागणीनुसार पोलिसांनी दगडफेकीच्‍या प्रकरणी अज्ञात व्‍यक्‍तींविरुद्ध गुन्‍हा नोंदवला; मात्र हिंदु संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी आरोपींना अटक करण्‍याची मागणी केली. काही कार्यकर्त्‍यांचा जमाव पोलीस ठाण्‍यापासून मुसलमानांच्‍या वस्‍तीकडे निघाला. जमावाला रोखण्‍यासाठी पोलीसही पोचले; मात्र त्‍याआधीच जमावाने अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्‍यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्‍या नळकांड्या सोडल्‍या.

संपादकीय भूमिका

भारतभरात हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर मागील वर्षानुवर्षे दगडफेक केली जाते. असे असतांना धर्मांधांवर वचक बसवण्‍यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न का करत नाही ?