नवी देहली – भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक,२०२४ च्या संदर्भात ७ सदस्यांचे पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये उत्तराखंड, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन सदस्य यांचा समावेश आहे.
हे पथक विविध राज्यांत जाऊन मुसलमान अभ्यासकांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या समस्या समजून घेतील आणि विधेयकावर सूचना गोळा करेल. तसेच ते वक्फ बोर्ड दुरुस्तीविषयीची आवश्यकता आणि त्याचे लाभ याविषयी त्यांना समजावून सांगतील.
१. याविषयी लोकसभा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली एक ३१ सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य आहेत.
२. समितीची पहिली बैठक २२ ऑगस्ट या दिवशी झाली. दुसरी बैठक ३० ऑगस्ट या दिवशी नवी देहली येथे झाली. बैठकीनंतर समितीने लोकांची मते आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावर ‘जेपीसी’ची पुढील बैठक ५ आणि ६ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.
३. संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट या दिवशी लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, २०२४ सादर केले होते. विरोधी पक्षांनी विरोध दर्शवल्यानंतर हे विधेयक लोकसभेत कोणतीही चर्चा न करता ‘जेपीसी’कडे पाठवण्यात आले होते.