‘मी मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जात असे. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर यांचा सत्संग लाभला. परात्पर गुरु डॉक्टर प्रीतीचा सागर आहेत. त्यांनाच ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तळमळ अधिक आहे. त्यांचे आचरण सर्व साधकांना आदर्शवत आहे. मला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.
(भाग १)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेनिमित्त धर्मरथावर सेवा करणे
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेनिमित्त धर्मरथावर २ मास सेवा केल्यावर पित्ताचा त्रास नाहीसा होणे : वर्ष १९९६-९७ मध्ये मुंबई येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभा होत असत. तेव्हा मी नुकताच साधना करू लागलो होतो. मी या सभांच्या सेवेत सहभागी झालो होतो. तेव्हा मला पित्ताचा पुष्कळ त्रास होत होता. मी त्यासाठी औषधे घेत होतो. ‘प्रतिदिन एका ठिकाणी सभा झाल्यावर रात्री सर्व साहित्य धर्मरथात भरणे आणि धर्मरथात झोपून दुसर्या ठिकाणी सभेसाठी जाणे’, असे माझ्या सेवेचे स्वरूप होते. धर्मरथात लोखंडी साहित्य होते. लोखंडी साहित्याचा माझ्या शरिराला स्पर्श झाल्यास पित्तामुळे माझ्या अंगावर पुरळ उठून माझे पूर्ण शरीर लाल होत असे. माझ्यावर औषधांचा काहीच परिणाम होत नव्हता. मी अनुमाने २ मास धर्मरथावर सेवा केली. त्यानंतर माझा पित्ताचा त्रास नाहीसा झाला आणि आतापर्यंत मला कधीही त्रास झाला नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी सभेच्या सेवेच्या माध्यमातून माझे प्रारब्ध फेडून घेऊन मला आनंद दिला.
१ आ. धर्मरथावर सेवा करणार्या २ साधकांचे देवतांच्या चित्रांविषयी आध्यात्मिक स्तरावरील निरीक्षण आणि उत्तरे गुरुदेवांना आवडणे : सभा झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर साधकांचा सत्संग घेत असत. तेव्हा साधक त्यांना आलेल्या अनुभूती किंवा त्यांच्याकडून झालेले नाविन्यपूर्ण प्रयत्न, यांविषयी सांगत असत. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांकडून २ वेगवेगळ्या पाकिटांत वस्तू ठेवून त्या बंद पाकिटांविषयी सूक्ष्मातील प्रयोग करून घेत असत. एकदा वडाळा, मुंबई येथील सभा संपल्यावर धर्मरथावर सेवा करणार्या एका साधकाने सत्संगात विचारले, ‘‘सभेत व्यासपिठाच्या बाजूला लावलेल्या श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम आणि मारुति या ४ चित्रांपैकी भगवान श्रीकृष्णाचे डोळे वेगळे वाटतात.’’ गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) याविषयी अन्य साधकांना विचारले. तेव्हा धर्मरथावर सेवा करणार्या एका साधकाने सांगितले, ‘‘कृष्ण पूर्णावतार आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे विराट रूप अर्जुनाला दाखवून ‘कर्ता-करविता तोच आहे’, याची अनुभूती दिली. अशा श्रीकृष्णाचे डोळे वात्सल्यरूपात दिसतात, तर श्रीराम, परशुराम आणि मारुति यांच्या डोळ्यांत क्षात्रतेज अधिक जाणवते.’’ तेव्हा गुरुदेवांना त्या दोन्ही साधकांचे निरीक्षण आणि उत्तर आवडले अन् त्यांनी या साधकांना खाऊ देण्यास सांगितले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकावर प्रीतीचा वर्षाव करून त्याला घडवणे
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकावर करत असलेल्या प्रीतीमुळे साधक पूर्णवेळ साधना करू लागणे अन् साधनेत टिकून असणे : मी सेवाकेंद्रात सेवेसाठी जात असे. तेव्हा गुरुदेवांच्या प्रेमळ बोलण्यामुळे मला तेथे जाण्याची प्रेरणा मिळत असे. काही वर्षांनी साधकांनी मला साधनेत येण्याचे कारण विचारल्यावर मी त्यांना ‘ईश्वरप्राप्ती करणे’, असे सांगत असे; पण मला आतून वाटत असे, ‘‘गुरुदेवांच्या प्रीतीमुळे मी साधनेत टिकून आहे.’’ एकदा गुरुदेवांच्या सत्संगात काही साधकांनी पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा गुरुदेव माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले, ‘‘हा पूर्णवेळ साधक कसा झाला ?’, त्याविषयी त्याला विचारा.’’ त्या वेळी ‘मी पूर्णवेळ साधक कसा झालो ?’, हे माझ्या लक्षात येत नसे.
२ आ. गुरुदेवांनी सर्वांशी नम्रतेने बोलण्याचा परिणाम साधकाच्या लक्षात आणून देणे : एकदा मला गुरुदेवांना दादर येथे रहाणारे पू. भानुदास महाराज यांच्या घरी चारचाकी गाडीने पोचवण्याची सेवा मिळाली होती. मी गुरुदेवांना पू. भानुदास महाराज रहात असलेल्या इमारतीखाली पोचवले. तेथे गाडी लावण्याची सोय होती; पण त्याचे पैसे द्यावे लागत असत. मी गाडी उभी केल्यावर तेथील कर्मचारी आला आणि मला म्हणाला, ‘‘येथे गाडी लावण्यासाठी पैसे देऊन पावती घ्यावी लागेल.’’ तेव्हा मी त्याला रागाने म्हटले, ‘‘मी थोडा वेळच येथे थांबणार आहे. तू पावती बनवू नकोस.’’ तो माझे ऐकत नव्हता. तेवढ्यात गुरुदेव तेथे आले आणि त्या व्यक्तीला म्हणाले, ‘‘मी याला इमारतीत वर खोली दाखवायला घेऊन जात आहे. तो लगेच परत येईल. कृपया तू पावती बनवू नकोस.’’ गुरुदेवांचे बोलणे ऐकल्यावर ती व्यक्ती ‘हो’ म्हणून तेथून निघून गेली. तेव्हा ‘सगळ्यांशी नम्रतेने बोलायला हवे’, हे मला गुरुदेवांकडून शिकायला मिळाले.’
(क्रमशः)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/ 831081.html
– श्री. सागर म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.३.२०२४)
|