राजकोट (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शिवारायांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण
मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून दुर्घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी असणारे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना ३१ ऑगस्टला येथील न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१. २६ ऑगस्ट या दिवशी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे साहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
२. त्यानुसार संशयित शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस या दोघांचा शोध घेत होते.
३. या घटनेची चौकशी करत असतांना ३० ऑगस्ट या दिवशी मालवण पोलिसांनी डॉ. पाटील यांना कोल्हापूर येथे कह्यात घेतले होते.
४. ४ डिसेंबर २०२३ या दिवशी नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद़्घाटन करण्यात आले होते. केवळ ९ मासांच्या कालावधीत पुतळा कोसळल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.