दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धुळे येथे ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची नेमणूक !; गोरेगाव (मुंबई) येथे ‘हिट अँड रन’ !…

धुळे येथे ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची नेमणूक !

धुळे – बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस ठाण्यात ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना अशासकीय संस्थेच्या माध्यमातून (एन्.जी.ओ.) प्रशिक्षण देण्यात आले आहे.


गोरेगाव (मुंबई) येथे ‘हिट अँड रन’ !

मुंबई – गोरेगाव येथील आरे वसाहतीत ‘हिट अँड रन’चा प्रकार घडला. पहाटे अल्पवयीन चालकाने २४ वर्षीय दुचाकीस्वारास धडक दिली. यात नवीन वैष्णव या तरुणाचा मृत्यू झाला. तो पहाटे दूध पोचवण्याचे काम करत असे. अल्पवयीन चालक नशेत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.


१७ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त !

मुंबई – येथे महसूल गुप्तवार्ता विभागाने १७ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी दोन महिलांसह एकाला अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पायल जैन, पंखुदेवी माली, राजेश कुमार जैन अशी त्यांची नावे आहेत. जप्त केलेल्या सोन्याचे मूल्य १६ कोटी ९१ लाख रुपये आहे.

संपादकीय भुमिका : अशा आरोपींना कठोर शिक्षाच व्हायला हवी !


पेट्रोल-डिझेल हद्दपार होणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

अमरावती – भारतामधून येत्या काळात पेट्रोल-डिझेल हद्दपार करण्याचा संकल्प मी केला आहे. येणार्‍या काळात वाहतूक पद्धत पालटत जाईल. मेळघाटसारख्या परिसरात चालक प्रशिक्षण केंद्र चालू होणे आवश्यक आहे. ‘चालकाने केवळ ८ घंटे वाहन चालवावे’, असा नियम करणार आहे. भारतामध्ये लवकरच ४०० इथेनॉल पंप चालू करण्याची योजना आहे. इथेनॉल वापरामुळे दळणवळण स्वस्त होईल, असे उद्गार ‘ड्रायव्हिंग स्कूल’च्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.


टायगर मेमनची ३ घरे केंद्र सरकारच्या कह्यात देण्याचे आदेश !

मुंबई – वर्ष १९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील हवा असलेला आरोपी टायगर मेमनच्या कुटुंबाची माहीम येथील इमारतीतील तीन घरे केंद्र सरकारच्या कह्यात देण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. टायगर मेमनच्या कुटुंबियांची या इमारतीत तीन घरे आहेत.