पणजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कार्यक्रम
पणजी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या वतीने येत्या वर्षभरात सरकारी खात्यांमधील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खाजन भूमीच्या संरक्षणासाठी ‘खाजन विकास आणि संवर्धन मंडळ’ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे केली. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पणजी येथील जुन्या सचिवालयासमोर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात सर्वच क्षेत्रांत वेगाने प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिलेले आहे. यासाठी विकसित भारत आणि विकसित गोवा यांसाठी गोमंतकियांनी पूर्ण क्षमतेने योगदान द्यावे. सरकार कौशल्य शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवत आहे. शेती व्यवसायात होत असलेले पालट आणि सरकारच्या नवनवीन योजना यांमुळे राज्यात शेती उत्पादनात वाढ होत आहे. राज्य सरकार प्रशासकीय व्यवस्था सक्षम करत आहे. यानुसार ९ तालुक्यांमध्ये नवीन प्रशासकीय इमारती उभारल्या जाणार आहेत. १९ डिसेंबरपर्यंत राज्य १०० टक्के साक्षर राज्य घोषित केले जाणार आहे. ‘ओ.एन्.जी.सी.’ या आस्थापनाचा ‘इंडिया एनर्जी वीक’ हा आता गोव्याचा वार्षिक उपक्रम होणार आहे.’’
लोकांना प्रश्न मांडण्यासाठी ‘मुख्यमंत्री हेल्पलाईन’ चालू
लोकांना त्यांचे प्रश्न मांडता यावेत, यासाठी १५ ऑगस्टपासून ‘मुख्यमंत्री हेल्पलाईन’ चालू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या सुविधेच्या माध्यमातून लोक त्यांच्या समस्या सरकारकडे मांडू शकणार असल्याचे ते पुढे म्हणाले.