Bengaluru Hindu Protest : बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’कडून आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा निषेध !

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

बेंगळुरू (कर्नाटक) – बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी आणि तेथील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने   बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये नुकतेच आंदोलन केले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रधर्म संघटना,राष्ट्ररक्षा पथक,राष्ट्रीय असंघटित पुरोहित कामगार परिषद, फाऊंडेशन इंडिया, आझाद ब्रिगेड, शिवगर्जना युवा सेना, समस्त विश्‍वधर्म रक्षा सेवा संस्थान इत्यादी हिंदु संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्र सरकारने बांग्लादेशातील हिंदूंचे रक्षण करावे ! – सौ. भव्या गौडा

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भव्या गौडा उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाल्या, ‘‘आज संपूर्ण बांग्लादेशात अराजकता निर्माण झाली आहे. तेथील हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. तेथील जिहाद्यांनी संपूर्ण मानवजातीला हादरवून टाकतील, असे अनन्वित अत्याचार तेथील  हिंदूंवर केले आहेत. केंद्र सरकारने तातडीने बांग्लादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे.’’

भारतातील सर्वधर्मसमभाववाले, बद्धीप्रामाण्यवादी आणि साम्यवादी यांचा ढोंगीपणा उघड ! – संतोष केंचाम्बा

‘राष्ट्रधर्म संघटने’चे श्री. संतोष केंचाम्बा म्हणाले, ‘‘भारतामध्ये तथाकथित सर्वधर्मसमभाववाले, बुद्धीप्रामाण्यवादी आणि साम्यवादी हे तुर्कीयेमध्ये एखादी घटना घडल्यावर त्याच्या विरोधात आवाज उठवतात, पॅलेस्टाईनमध्ये आतंकवाद्यांना ठार मारले तर आवाज उठवतात; परंतु बांग्लादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाविषयी  काहीच बोलत नाही. त्यामुळेे त्यांची ढोंगी मानसिकता दिसून येते.’’

या आंदोलनात ‘राष्ट्रीय पुजारी कामगार परिषदे’चे सचिव डॉ. महेश कुमार बी.एन्., ‘राष्ट्र रक्षा पथका’चे श्री. पुनीत केरेहळ्ळी, ‘हिंदवी झट्का मीट’चे संस्थापक श्री. मुनेगौडा, ‘आझाद ब्रिगेड’चे श्री. गजेंद्र सिंह, ‘शिवगर्जना युवा सेने’चे अध्यक्ष श्री. प्रवीण माने, ‘समस्त विश्‍वधर्म रक्षा सेवा संस्थान’चे योगी संजीत सुवर्ण यांच्यासह ४५० हून अधिक हिंदु कार्यकर्ते सहभागी झाले होते.