गांजा म्हणून गवत दिल्याच्या वादातून पर्यटकाची हत्या

म्हापसा, १३ ऑगस्ट (वार्ता.) – बागा समुद्रकिनार्‍यावर हर्ष दिनेश तन्वर (वय २५ वर्षे, रहाणारा देहली) या पर्यटकाची हत्या गांजा विक्रीच्या वादातून घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत संशायित आरोपी साहिल उपाख्य विशाल भटनागर (रहाणारा म्हाड्डावाडो आणि मूळचा उत्तराखंड), नूर महंमद खान (रहाणारा काणका, पर्रा) आणि सुनील विश्वकर्मा (मूळचा नेपाळ येथील) या तिघांना कह्यात घेतले आहे. तिन्ही संशयितांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रानुसार संशयित आरोपी हर्ष याला गांजाचा पुरवठा करण्यासाठी बागा समुद्रकिनार्‍यावर गेले होते. त्यानंतर गांजा म्हणून गवत दिल्याचे हर्ष याला समजले. याविषयी जाब विचारल्यानंतर संशयित आणि हर्ष यांच्यामध्ये वाद आणि धक्काबुक्की झाली. संशयितांमधील दोघांनी हर्षवर सुरीने आक्रमण केले. हर्षची हत्या केल्यानंतर संशयितांनी हर्षकडील १० सहस्र रुपयेही पळवले.

संपादकीय भूमिका 

अशा घटना पर्यटनक्षेत्र आणि गोवा राज्य यांना कलंकित करणार्‍या !