छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या कारवाईत ३० टन गोमांस जप्त !

धुळे-सोलापूर रस्त्यावरील मोक्याच्या जागेवरून देशभर गोमांस विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय !

जप्त केलेल्या वाहनांसह गोरक्षक

दौलताबाद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – धुळे-सोलापूर रस्त्यावरील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परीसरातील जांभाळा गावात एका आस्थापनाच्या शेडमध्ये गुन्हे शाखेने धाड घातली. तेथे आणि जवळच्या हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ९ गाड्यांमध्ये असे एकूण ३० टन गोमांस हस्तगत केले आहे. ३ ऑगस्टला सकाळी ११ पासून चालू झालेली ही कारवाई रात्री ११ वाजेपर्यंत चालू होती. येथील एका हॉटेलसमोर गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त करण्यात आली असून ८ जणांना कह्यात घेण्यात आले. मानद पशूकल्याण अधिकारी राहुल कदम आणि त्यांच्या पथकाने पुरवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही धाड टाकली. या आस्थापनात अवैधरित्या कत्तल करून गोमांस पॅकिंग करून धुळे-सोलापूर रस्त्यावरील या मोक्याच्या जागेवरून देशभर ते विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय आहे.

काही दिवसांपूर्वीच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील माळीवाडा परिसरात ८०० किलो गोमांस घेऊन जाणारे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तिसर्‍याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. (याचा अर्थ पोलिसांच्या कारवाईचा कोणताच धाक गोतस्करांना नाही, हे लक्षात येते ! त्यामुळे अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे ! – संपादक)

पुण्याहून आले पथक !

मानद पशूकल्याण अधिकारी राहुल कदम, प्रकाश खोले आणि अथर्व सारडा या पुण्याहून आलेल्या पथकाने ही गुप्त माहिती पुरवली होती. (जी माहिती या पथकाला मिळते, ती सर्व यंत्रणा आणि गुप्तचर असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ? कि त्यांचे गोतस्करांशी साटेलोटे आहे ? याची चौकशी सरकारने केली पाहिजे ! – संपादक) छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या वतीने संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोचून याची निश्‍चिती करून ही कारवाई केली. एका मोठ्या शेडमधे मोठ्या प्रमाणात गोमांसाची साठवणूक केल्याचे आणि त्याची ‘पॅकिंग’ केली जात असल्याचे तेथे आढळून आले. ही कारवाई सर्वश्री मिलिंद एकबोटे, आशीष जाधव, मनीष वर्मा आणि नवनाथ पाटवकर आदींच्या सहकार्याने पार पडली.

संपादकीय भूमिका

  • महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायी आणि गोमांस यांची तस्करी चालू असणे हे पोलिसांना लज्जास्पद !
  • ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गोहत्या होते, गोमांस आढळते तेथील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली, तरच पोलीस कृतीशील होतील !