‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना !

माजी आमदार नितीन शिंदे यांचा ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून समावेश !

श्री. नितीन शिंदे

सांगली, २४ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना या प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेनुसार वर्ष १६५६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम झाले. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी या गडाच्या पायथ्याशी शिवरायांनी वाघनखांच्या साहाय्याने अफझलखानाचा वध केला. मराठा लष्करी वास्तू स्थापत्याचा वैश्विक नमुना असलेल्या १२ गडांना जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी केंद्रशासनाने ‘युनेस्को’ला प्रस्ताव पाठवला आहे. त्यात प्रतापगडाचाही समावेश आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’त सांगली येथील माजी आमदार श्री. नितीन शिंदे, हिंदुत्वनिष्ठ श्री. मिलिंद एकबोटे, ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे, श्री. सदाशिव टेटवीकर, श्री. सोमनाथ धुमाळ, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. पंकज चव्हाण, श्री. अमोल जाधव यांचा ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.