बलात्काराच्या आरोपाखाली कोलवाळ कारागृहात असलेल्या आरोपीने पीडितेला खटला मागे घेण्यासाठी भ्रमणभाषवरून दिली धमकी !

पणजी, १७ जुलै (वार्ता.) – बलात्काराच्या आरोपाखाली कोलवाळ येथील कारागृहात असलेल्या आरोपीने बलात्कार केलेल्या १४ वर्षीय मुलीला भ्रमणभाषद्वारे संपर्क करून आरोपीवर असलेला खटला मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. आरोप मागे न घेतल्यास तुझे वडील आणि भाऊ यांना वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी आरोपीने धमकी दिली. धमकी दिल्याने ही १४ वर्षांची पीडित मुलगी भयग्रस्त झाली आहे. आरोपी केवळ कारागृहातून धमकी देत नाही, तर सुनावणीच्या वेळीही पीडितेला तिने साक्ष कशी द्यायची याविषयी तिच्यावर दबाव आणतो.

पीडित मुलगी म्हणाली, ‘‘४ जुलै या दिवशी न्यायालयात झालेल्या अंतिम सुनावणीच्या वेळी हा खटला मागे घेण्यात यावा, असे सांगण्यासाठी आरोपीने दबाव आणला.’’ पीडितेला साहाय्य करण्यात येणार्‍या ‘व्हिक्टीम असिस्टंन्स युनिट’च्या (पीडित साहाय्य केंदाच्या) आणि तिच्या आईच्या उपस्थितीत ही पीडित मुलगी म्हणाली, ‘‘आरोपीने सांगितल्याप्रमाणे मी न्यायालयात त्या आरोपीवरील आरोप नाकारणार आहे. मला माझ्या वैयक्तिक सुरक्षेविषयी काळजी वाटते. आरोपीने कुणाला तरी माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे.’’ याविषयी पीडित साहाय्य केंदाचे समन्वयक एमिडिओ पिन्हो म्हणाले, ‘‘पीडितांनी न्यायालयात कसे वागावे ? याविषयी गुन्हेगारांकडून शिकवण दिली जाते. या प्रकरणातील आरोपीने पीडितेला सांगितले की, न्यायालयीन कामाकाजाच्या वेळी उभे राहून न्यायाधिशांना स्वतःला बोलण्यास द्यावे, अशी विनंती कर, तसेच आरोपीने मला काहीही केलेले नसून बळजोरीने मला त्याच्या विरोधात साक्ष द्यायला लावली, असे सांग. अशा गोष्टी घडल्या तर आरोपी हा सरकारी पाहुणा होईल आणि त्याच्या रहाण्याचा आणि जेवणाचा खर्च नागरिकांनी दिलेल्या महसुलातून केल्यासारखे होईल. तो कारागृहातून संपर्क करून पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना धमकी देत आहे. अशाने न्यायव्यवस्थेवरील विश्वास न्यून होऊन पीडितांना आधार देणार्‍या यंत्रणेचे प्रयत्न वाया जातील.’’

संपादकीय भूमिका 

  • कारागृहात बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांकडे भ्रमणभाष कुठून येतो ?
  • गुन्हे रोखायचे असतील, तर आधी भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे !