‘उंटा’ला सलामी !

सुभाष दांडेकर

गेल्या ८ दशकांपासून अगदी मागील पिढीपर्यंत भारतातील अगदी खेड्यापाड्यांतीलही प्रत्येक विद्यार्थ्याचे भावविश्व ‘कॅमलिन’विना केवळ अपूर्ण आहे. आता लेखनसामग्रीची अन्य आस्थापने आली असली, तरी आजही एक दर्जा म्हणून ‘कॅमलिन’च्याच सामग्रीला परंपरेमुळे प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात अनेक नामवंत उद्योजक निर्माण झाले, त्यांपैकीच एक होते ‘कॅमलिन’चे दांडेकर ! ‘कॅमलिन’चे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांच्या निधनाचे वृत्त १५ जुलै या दिवशी आले आणि भारतातील प्रत्येक साक्षराला क्षणभर त्याच्या विद्यार्थीदशेत घेऊन गेले !

सुभाष दांडेकर यांच्या वडिलांनीही त्या काळात रसायनशास्त्रातील पदवी घेतली होती आणि त्यानंतर वर्ष १९३१ मध्ये शाई आणि गोंद (गम) बनवण्याचा व्यवसाय चालू केला. उंट हा विश्वासार्ह, कठीण काळात साथ देणारा आणि अधिक काळ चालत रहाणारा प्राणी आहे. त्यामुळे सर्वांना लक्षात राहील, असा सोप्या नावाचा ‘ब्रँड’ त्यांच्या वडिलांनी निवडला. वर्ष १९४२ मध्ये गांधीजींनी पुकारलेल्या स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन दांडेकर यांच्या वडिलांनी येथे मोठ्या मेहनतीने शाईची निर्मिती केली होती; परंतु ती विकण्यात अडचणी येत; कारण तेव्हा ‘भारतात एवढे चांगले उत्पादन बनू शकते’, यावर कुणाचा विश्वास बसत नसे. त्यामुळे जेव्हा पुढे सुभाष दांडेकर यांनी वर्ष १९५८ मध्ये या व्यवसायात लक्ष घालण्यास आरंभ केला, तेव्हा त्यांनी ‘यात नवीन काहीतरी करायचे’, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली. टाचणीपासून इंजिनपर्यंत प्रत्येक वस्तू आयात करण्याच्या काळात ‘मी काहीतरी स्वदेशी बनवीन’, ही त्यांची प्रेरणा तीव्र होती. त्यामुळेच ते आज ‘कॅमलिन’ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करवून देऊन तो कित्येक वर्षे टिकवू शकले. सुभाष दांडेकर यांचे हे बहुमोल यश आज त्यांच्या ४ थ्या पिढीलाही सांभाळावेसे वाटत आहे, हे कौतुकास्पद आहे.

सर्वच भारतीय चित्रकारांनी ‘कॅमलिन’चे रंग वापरले. भारतातील सर्व चित्रकार हे ‘कॅमलिन’चे सदैव ऋणी रहातील; कारण अलीकडच्या काळात त्यांनीच भारतात रंगांचे उत्पादन सर्वप्रथम चालू केले आणि त्यात पुढे संशोधन करून विविध प्रकारचे रंग निर्माण केले. सर्व भारतीय चित्रकारांना रंगमय होण्यास साहाय्य झाल्याने त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली. भारतीय चित्रकलेच्या विश्वात रंगांच्या दुनियेचे ‘रंगभरे जग’ निर्माण होण्याचा पाया ‘कॅमलिन’च्या रंगांनी रचला ! ‘पोस्टर कलर’, विद्यार्थ्यांसाठीचे ‘वॉटर कलर’, कलाकारांचे ‘वॉटर कलर’, ‘ॲक्रॅलिक कलर’, ‘ऑईल कलर’ असे त्यांच्या औद्योगिकतेचे रंग वर वर चढतच राहिले.

यशाचे गमक !

सुभाष दांडेकर

‘गुणवत्ता’ हे दांडेकर यांच्या यशस्वी उद्योगामागचे एक महत्त्वाचे गमक होते. शाई, रंग यांपासून छोट्यातल्या छोट्या सामुग्रीविषयीही त्यांनी कधीच गुणवत्तेशी तडजोड केली नाही. त्यांचे म्हणणे असायचे की, ‘माझी शाई किंवा रंग आज या तापमानात चांगला आहे, तो देहलीतील तापमानातही चांगला राहिला पाहिजे. तर माझ्या उत्पादनाला किंमत आहे.’ आताही त्यांच्या आस्थापनात उत्पादन निर्माण होत असतांना एक जरी अल्प गुणवत्तेचे उत्पादन आढळले, तरी कर्मचार्‍याला बटण दाबून ते यंत्र थांबवण्याची सुविधा आणि अधिकार आहे. जपानमधील एका परिषदेतून ‘शून्य चूक’ (‘झिरो डिफेक्ट’) या संकल्पनेची प्रेरणा त्यांनी घेतली होती आणि ती कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न केला. ‘टॅलेंट’ (कौशल्य), ‘टेक्नॉलॉजी’ (तंत्रज्ञान), ‘ट्रेनिंग’ (शिक्षण) आणि ‘टीम’ (कर्मचारी) या चार ‘टी’चा वापर त्यांनी पुरेपूर योग्य पद्धतीने केला. रतन टाटा हे त्यांचे व्यवसायातील आदर्श होते, याचे मुख्य कारण म्हणजे ते सचोटी आणि नीतीमत्तेने व्यवसाय करत होते. आस्थापनाच्या एकूण लाभातील २० ते २५ टक्के लाभ कर्मचार्‍यांना देण्याची पद्धत त्यांनी चालू केली. अधिकारीवर्गापासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्वच स्तरांवर चांगले वेतन, कर्मचार्‍यांशी अत्यंत आपुलकीने वागणे आणि दुःखाच्या, अडचणीच्या प्रसंगी त्यांच्यासमवेत असणे, ही बांधीलकी त्यांनी कायम जपली. कर्मचार्‍यांचे वेतन त्यांच्या अधिकोषाच्या खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना कधीच कर्मचार्‍यांविषयीच्या अडचणी आल्या नाहीत. त्यांच्या वडिलांनी त्या काळी ‘प्रॉव्हिडंट फंड’, ‘बोनस’, ‘बाळंतपणाची रजा’ या सुविधा देण्याची पद्धत नसतांनाही त्या चालू केल्या होत्या. ‘कर्मचार्‍यांना ‘हा आपला उद्योग आहे’, असे वाटले पाहिजे’, असे त्यांचे म्हणणे होते. हे त्यांच्या यशाचे दुसरे गमक होते. काही दशकांपूर्वीपासून एकत्र कुटुंबात व्यवसाय उभारणे आणि तो चालू ठेवणे, हे तसे सोपे नव्हते. एखादा नवीन किंवा वेगळा निर्णय घ्यायचा झाला, तर संबंधित सर्वांना तो पटवून द्यावा लागायचा. अर्थातच ते कौशल्य त्यांच्यात होते आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे निभावलेही; म्हणून त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला. ‘नवीन उद्योजकांनी काळाच्या पुढचा विचार करायला शिकले पाहिजे. प्राण्यांना जसे भूकंपाच्या आधी कळते, तसे उद्योजकांना काळाच्या पुढची चाहूल आधीच लागली पाहिजे’, असे दांडेकर यांचे म्हणणे होते.

रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ते जर्मनीत ‘ग्लासगो’ विद्यालयात गेले. तिथे रंगांचे ज्ञान असलेले चांगले मार्गदर्शक मिळाले. त्यांच्याकडून ते बरेच काही शिकले आणि त्यांनी संशोधन केले. भारतात रंगांचे ‘काम’ करायचे पूर्ण डोक्यात ठेवूनच ते तिथे गेले होते आणि आल्यावर त्या सार्‍याचा उपयोग करून त्यांनी अभियंते आणि कलाकार वापरतात, ती ‘वॉटरप्रूफ ड्रॉईंग इंक’ त्यांनी प्रथम बनवली. ब्रिटन आणि जर्मनी येथील प्रयोगशाळांत त्यांनी विविध प्रकारच्या चाचण्या अन् संशोधन केले आणि विदेशात न रहाता भारतातच उद्योग वाढवण्याचा निर्णय वर्ष १९६२ मध्ये घेतला. रंग त्यांचे ‘मिशन’ (ध्येय) आणि ‘पॅशन’ (आवड) बनले. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ग्राहकांची आवश्यकता ओळखून त्यांनी रंगांसमवेत ‘कॅनव्हास’, ‘ब्रश’, ‘ऑईल स्केचिंग पेपर’, कंपासपेटी यांसारखी अनेक सामुग्री निर्माण केली. वर्ष १९७२ पासून त्यांनी चालू केलेल्या ‘ऑल इंडिया कॅमल चित्रकला’ या शालेय स्पर्धेत आतापर्यंत ४८ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. त्यांनी ‘कॅमल आर्ट फाऊंडेशन’ची निर्मिती केली. भारतात ‘लीड पेन्सिल’ त्यांनी प्रथम चालू केली. काही वर्षांपूर्वी कॅमलिन आस्थापनाने ‘कोकूयो’ नावाच्या जपानी आस्थापनासमवेत करार करून संयुक्त आस्थापन निर्माण केले. सुभाष दांडेकर आता आपल्यात नसले, तरी एक ‘आदर्श आणि ध्येयनिष्ठ उद्योजक कसा असावा ?’, याचा धडा त्यांनी घालून दिला. मराठी माणसातून हा आंतरराष्ट्रीय उद्योजक जन्माला आला आणि घडला, याचा अभिमान मराठी माणसाला सदैव राहील !

नीतीमत्ता आणि सचोटी यांमुळे यशस्वी झालेले ‘कॅमलिन’चे सुभाष दांडेकर यांच्याकडून होतकरू उद्योजकांनी प्रेरणा घ्यावी !