पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १२ जुलै – आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढली असून पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत पोचली आहे. भाविकांना दर्शनरांगेत सुविधा देण्यासाठी एकीकडे प्रशासन आणि मंदिर समिती प्रयत्न करत असतांना दर्शनरांगेत उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने विनेगल्ली येथील दर्शन रांगेत एका भाविकास धक्काबुक्की केली. या वेळी संबंधित भाविक, त्याचे कुटुंबीय आणि सुरक्षारक्षक यांच्यातील चालू असलेला वाद सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे.
मंदिर समितीने सुरक्षारक्षकावर असभ्य वर्तणुकीचा गुन्हा नोंद करावा ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, वारकरी पाईक संघ
मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्यात तक्रारी होत असल्याचे प्रकार घडत आहेत; मात्र यातून मंदिर समितीने कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. १२ जुलै या दिवशी सुरक्षारक्षकाकडून भाविकाला झालेल्या धक्काबुक्कीची चौकशी झाली पाहिजे. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे मंदिर समितीकडून संबंधित सुरक्षारक्षकाचे केवळ निलंबन न करता ‘असभ्य वर्तणुकीचा गुन्हा’ नोंद करावा आणि यापुढे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी केली आहे.