Allahabad High Court : न्‍यायालयाचा आदेश डावलून पोलिसांनी हिंदु प्रियकरासमवेत रहाणार्‍या मुसलमान युवतीला दिले तिच्‍या वडिलांच्‍या कह्यात !

उच्‍च न्‍यायालयाने पोलिसांवर ओढले ताशेरे

लक्ष्मणपुरी – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाकडे दुर्लक्ष करणे अयोध्‍या पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. हिंदु प्रियकर आणि मुसलमान प्रेयसी यांच्‍या शांततामय जीवनात पोलीस अडथळा ठरल्‍याने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने पोलिसांवर  कडक शब्‍दांत ताशेरे ओढले. प्रत्‍यक्षात न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या विरोधात पोलिसांनी मुसलमान प्रेयसीला बलपूर्वक तिच्‍या वडिलांच्‍या कह्यात दिले. या प्रकरणी हिंदु प्रियकराने उच्‍च न्‍यायालयात दाद मागितली होती. लखनौ खंडपिठाचे न्‍यायमूर्ती राजीव सिंह यांनी प्रियकराने प्रविष्‍ट (दाखल) केलेल्‍या अवमान याचिकेवर सुनावणी करतांना, पुरा कलंदर पोलीस ठाण्‍याचे निरीक्षक रमाशंकर सरोज यांना समन्‍स बजावले आहेत.

१. हिंदु तरुणाने त्‍याच्‍या याचिकेत म्‍हटले आहे, ‘माझ्‍या मुसलमान प्रेयसीच्‍या वडिलांचा आमच्‍या नात्‍याला विरोध होता. आम्‍ही दोघांनीही उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करून संरक्षणाची मागणी केली होती.

२. त्‍यावर ५ मार्च २०२४ या दिवशी न्‍यायालयाने अयोध्‍या पोलिसांना आमच्‍या शांततापूर्ण जीवनात हस्‍तक्षेप न करण्‍याचा आदेश दिला होता. न्‍यायालयाच्‍या आदेशानंतरही पोलिसांनी बलपूर्वक प्रेयसीला तिच्‍या वडिलांच्‍या कह्यात दिले.

३. न्‍यायालयाने पोलिसांकडून माहिती मागितली असता, मुलीच्‍या वडिलांनी तक्रार केल्‍याचे सांगण्‍यात आले.

संपादकीय भूमिका

  • न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान करणार्‍या अशा पोलिसांना न्‍यायालयाने केवळ ताशेरे ओढून न थांबता त्‍यांना कठोर शिक्षा सुनावणे हिंदूंना अपेक्षित आहे !
  • लव्‍ह जिहादच्‍या अनेक प्रकरणांमध्‍ये हिंदु तरुणीचे नातेवाईक पोलीस ठाण्‍यात तक्रार करतात; मात्र पोलीस त्‍याकडे दुर्लक्ष करतात. हेच पोलीस हिंदु प्रियकर आणि मुसलमान प्रेयसी असतांना न्‍यायालयाचा आदेश डावलून मुसलमानांना साहाय्‍य करतात, हे लक्षात घ्‍या !