परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवल्याने आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने हाताचे दुखणे थांबून शस्त्रकर्म टळणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. झोपेतून उठल्यावर डावा हात हालवता न येणे आणि काही कालावधीनंतर चाचणी केल्यावर आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्याविना पर्याय नसल्याचे सांगणे

श्री. हिरालाल तिवारी

‘२२.२.२०२१ या दिवशी मला झोपेतून उठल्यावर डावा हात हालवता येत नव्हता. तेव्हा माझ्या मनात ‘एखादी नस आखडली असेल’, असा विचार आला. मी काही दिवस घरगुती उपचार केले; तरीही त्रास वाढतच गेला. मी आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी ‘फ्रोझन शोल्डर’ हा आजार असू शकतो’, असे सांगितले. काही कालावधीनंतर हाताचा त्रास अधिकच वाढत गेला. मला आधुनिक वैद्यांनी ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी (MRI) करायला सांगितले. चाचणी केल्यावर ‘दंड आणि खांदा यांना जोडणारी नस तुटली आहे अन् त्यावर शस्त्रकर्म (शस्त्रक्रिया) करण्याविना पर्याय नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

२. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सुचवले असले, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझे वैद्य आहेत’, असे वाटून त्यांना त्रासांविषयी आत्मनिवेदन करणे

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनीही मला शस्त्रकर्म करण्यास सुचवले. तेव्हा माझी शस्त्रकर्म करण्याची मानसिक आणि आर्थिक सिद्धता देवानेच करून घेतली; पण हे सर्व चालू असतांना माझ्या मनात ‘प.पू. गुरुदेवच माझे वैद्य आहेत’, असा विचार येत होता. मी त्यांनाच अधून-मधून माझ्या त्रासांविषयी आत्मनिवेदन करत असे.

३. सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप केल्यावर १५ दिवसांत हात बरा होणे

या कालावधीत सद्गुरु स्वातीताईंचे (सद्गुरु स्वाती खाडये यांचे) सोलापूर सेवाकेंद्रात वास्तव्य होते. त्यांनी मला आध्यात्मिक त्रासांविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना विचारून घ्यायला सांगितले. सदगुरु काकांना विचारल्यावर त्यांनी मला ‘श्री अग्निदेवाय नमः।’, हा नामजप करायला सांगितला. मी हा नामजप नियमित करत होतो. तेव्हा साधारण ५ – ६ दिवसांतच माझा हात दुखायचा उणावला. आता मला हात थोडा उचलता येऊ लागला आणि १५ दिवसांतच माझा हात पूर्ण बरा झाला.

४. नामजपादी उपाय केल्याने हात बरा झाल्याचे सांगितल्यावर आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटणे

मी आधुनिक वैद्यांकडे जाऊन हात दाखवल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी मला ‘हे कशामुळे झाले ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना सनातनच्या संतांनी सांगितलेल्या नामजपाच्या उपायांविषयी सांगितले. त्या वेळी त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.’

– श्री. हिरालाल तिवारी, सोलापूर

यजमानांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून भावपूर्ण नामजप केल्याने त्यांचा दुखणारा हात ठीक होणे

‘माझे यजमान श्री. हिरालाल तिवारी यांचा हात दुखत असतांना देवाने त्यांची पुष्कळ काळजी घेतली. त्यांनी नामजप भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. हात दुखत असला, तरी त्यांची सेवा नियमित चालू होती, तसेच त्यांची वैयक्तिक कामेही चालू होती. यजमानांना ‘गुरुदेवच माझे डॉक्टर आहेत’, याची निश्चिती होती. ते जप करतांना जेव्हा सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) सभागृहात असायच्या, तेव्हा ते ‘दुर्गादेवीच्या चरणांशी बसून जप करत आहे’, असा भाव ठेवत असत. ते ‘नामजप नियमित आणि परिणामकारक होण्याकडे लक्ष देत असत. त्यामुळे त्यांचा दुखणारा हात ठीक झाला. श्रीगुरूंनी केलेल्या कृपेमुळेच आम्ही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकलो. यासाठी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. राजश्री तिवारी (श्री. हिरालाल तिवारी यांची पत्नी), सोलापूर

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक