रामनाथी (गोवा) – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले सनातनचे साधक श्री. विक्रम भावे यांच्यासह ‘हिंदुत्वाचे कार्य’ म्हणून हा न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अधिवक्त्या (सौ.) मृणाल व्यवहारे-साखरे आणि अधिवक्त्या (सौ.) स्मिता देसाई यांचा भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या हस्ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये सत्कार करण्यात आला.
शाल, श्रीफळ आणि देवतांची सात्त्विक प्रतिमा देऊन आमदार टी. राजा सिंह लोध यांनी या सर्वांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमी हिंदूंनी सभागृहात ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या खटल्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे सर्वाेच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड आदी अधिवेशनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत.
या सर्वांचे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये अभिनंदन करण्यात आले आणि घोषणांनी सन्मान करण्यात आला.
या सत्काराच्या वेळी श्री. विक्रम भावे यांची पत्नी सौ. वैदेही भावे आणि मुलगी कु. इंद्रश्री या उपस्थित होत्या.