वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : उद्बोधन सत्र  – न्याय आणि राज्यघटना

न्यायव्यवस्थेत पालट होण्यासाठी आंदोलन छेडणार ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय

रामनाथी – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण हे हत्येचे एक प्रकरण आहे; मात्र त्याला सर्व अन्वेषण यंत्रणांनी वेगळेच वळण दिले. सनातनच्या साधकांना या प्रकरणात गोवणे, या एकमेव उद्देशाने हा खटला चालवण्यात आला. त्याच दिशेने एकाच पद्धतीने हा खटला पुढे नेण्याचा प्रयत्न या यंत्रणांनी केला. कुठल्या तरी मोठ्या दबावाखाली या प्रकरणाचे अन्वेषण केले जात होते. अशा वेळी न्यायाधीश निष्पक्ष रहात नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालय  बारीक लक्ष ठेवून होते. त्यामुळेही सर्वांवर त्याचा दबाव होता. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले; मात्र त्यामध्ये विरोधाभास होता. हे प्रकरण न्यायालयाने अनेक वर्षे रेंगाळत ठेवले आणि सनातनच्या साधकांना त्याचा मनस्ताप सोसावा लागला अन् सनातन संस्थेची अपरिमित हानी केली. सद्यःस्थितीत न्यायव्यवस्थेत पालट होण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असे विधान हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता घनश्याम उपाध्याय यांनी केले.

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय पुढे म्हणाले की, आज न्यायालयात ‘हिंदु विरुद्ध अहिंदु’ असा लढा चालू आहे. सध्याच्या नक्षलवादी आणि साम्यवादी विचारसरणी असणार्‍या न्यायाधिशांना ऐषोआरामात जीवन जगायचे आहे. त्यांना धर्म, संस्कृती, मर्यादा यांचे पडलेले नाही. या न्यायाधिशांना धर्माविषयी काहीच ज्ञान नाही. न्यायाधिशांना न्यायशास्त्र, मर्यादा, धर्मशास्त्र, धर्म-अधर्म यांचे ज्ञान असेल, तर ते व्यवस्थित न्यायदान करू शकतात. राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही लोकांची ‘इकोसिस्टम’ खूप प्रभावी आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आपला दबावगट सिद्ध करणे महत्त्वाचे आहे.

हिंदु राष्ट्रासाठी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मी, विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची निर्दाेष मुक्तता झाली; परंतु शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना झालेली शिक्षा ही अन्यायकारक आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयात त्यांचे निर्दाेषत्व सिद्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्याला रोखण्यासाठी हा खोटा खटला उभा केला गेला; मात्र यामुळे आम्ही हिंदुत्वाचे कार्य थांबवणार नाही. सत्तेसाठी काही राजकीय लोकांनी हिंदुत्वनिष्ठांना फसवण्याचा प्रयत्न केला. स्वार्थी राजकारणामुळेच हिंदुत्वनिष्ठांमध्ये फूट पडत आहे. ज्याने माता सरस्वतीदेवीचा अवमान केला, त्या नेत्याला महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात घेण्यात आले. असे स्वार्थी नेते प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. या सर्वांविरोधात हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्रासाठी काम करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. त्यांचे भाषण ‘व्हिडिओ’द्वारे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात दाखवण्यात आले.

सीबीआयचे अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करीन ! – विक्रम भावे, सनातन संस्थेचे साधक

रामनाथी – सीबीआयचे अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला खोट्या आरोपाखाली अटक केली होती. ‘दुसर्‍या राज्यातील एका प्रकरणाखाली अटक करण्यात येत आहे’, असे सिंग यांनी मला सांगितले. सुभाष रामरूप सिंग यांनी माझ्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले. मी जामिनासाठी अर्ज केला; परंतु  माझा जामीनअर्ज फेटाळण्यात आला. माझ्यावर आतंकवादाचा आरोप असल्याचे खोटेच सांगून मला जामीन संमत करण्यात आला नाही. त्यामुळे मी कुठलाही गुन्हा केलेला नसतांना मला २ वर्षे कारावासात खितपत पडावे लागले.

पुढे न्यायालयाने माझी निर्दाेष मुक्तता केली. त्यामुळे चूक नसतांना मला २ वर्षे कारावासात डांबून ठेवले गेले, हे न्यायालयात सिद्ध झाले. सीबीआयचे अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी सूडभावनेने माझ्यावर अन्याय केला. अशा सुभाष सिंग यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करीन.