कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची त्वरित नोंद न घेतल्यास १५ ऑगस्टला उपोषण करणार !

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती आणि संघर्ष समिती यांची चेतावणी

सिंधुदुर्गनगरी – कोकण रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण केले, तरी प्रवाशांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. कोकण रेल्वे कोकणातून जाऊनसुद्धा याचा लाभ गोवा, केरळ यांसह अन्य राज्यांना मिळत आहे. कोकणातील प्रवाशांना मात्र जनावरांप्रमाणे कोंबून या रेल्वेतून प्रवास करावा लागत आहे. कोकणातील प्रवाशांच्या समस्यांची त्वरित नोंद न घेतल्यास १५ ऑगस्टला उपोषण करू आणि त्यानंतर ‘रेल्वे रोखा’सारखी आंदोलने केली जातील, अशी चेतावणी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती आणि संघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून लांब पल्ल्याच्या १५ गाड्या अन्य राज्यांत जातात; मात्र या गाड्या रत्नागिरी स्थानकानंतर मध्ये कुठेही न थांबता थेट मडगाव (गोवा) स्थानकावर थांबतात. या सर्व गाड्यांना रत्नागिरी नंतर ‘सिंधुदुर्ग स्थानका’वर थांबा देण्यात यावा. कसाल येथे रेल्वेस्थानक बांधावे. यासह अन्य मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी विधानसभेच्या २६ जूनपासून चालू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात कोकणातील सर्व आमदारांनी एकत्र होऊन ठराव संमत करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.