दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कत्तलीपासून गोवंशियांची मुक्तता !; एस्.आर्.पी.एफ्. भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी युवकांचा गोंधळ !…

कत्तलीपासून गोवंशियांची मुक्तता !

वणी (यवतमाळ), २५ जून (वार्ता.) – आदिलाबाद येथे कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून १२ गोवंशियांची मुक्तता केली. त्या सर्वांची गोशाळेत रवानगी केली. या वेळी ४ मालवाहू वाहनांसमवेत २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपींना अटक झाली. (गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांना धाक नाही ! – संपादक)


एस्.आर्.पी.एफ्. भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी युवकांचा गोंधळ !

 जालना – जालना येथे ‘एस्.आर्.पी.एफ्.’ची (राज्य राखीव पोलीस दलाची) २४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये मैदानी चाचणीमधील १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात गैरप्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी तक्रार केली असता ५ घंटे उलटून गेल्यावरही तक्रारीची कुणी नोंद घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही भरती प्रक्रिया स्थगित किंवा रहित करावी, अशी मागणी केली. या वेळी उमेदवारांनी एकत्र येत घोषणा दिल्या. (विद्यार्थी तक्रार करत असतांना तिची नोंद का घेतली गेली नाही ? यातूनच यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे, असे वाटते ! – संपादक)