कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून वर्षभरात २१ कोटी १७ लाख ८० सहस्र ७४१ रुपये वसूल

  • उत्कृष्ट रेल्वे तिकीट तपासनिसांना पारितोषिके

  • २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ७८ सहस्र ११५ घटना

मडगाव (प्र.प.) – एका औपचारिक समारंभात, कोकण रेल्वे महामंडळाने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पहिल्या २० रेल्वे तिकीट तपासनिसांचा सत्कार केला.

संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये तिकीट तपासनिसांनी एकूण ३ सहस्र ९९० मोहिमा राबवल्या. यात विनातिकीट प्रवास करणार्‍या ७८ सहस्र ११५ घटनांत प्रवाशांना दंडित केले आणि त्याद्वारे २१ कोटी १७ लाख ८० सहस्र ७४१ रुपये वसूल केले. त्यांच्या या उत्कृष्ट योगदानाबद्दल, उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तिकीट तपासनिसांना कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते कौतुक प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. कोकण रेल्वेला आपल्या तिकीट तपासनिसांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो आणि आपल्या कर्मचार्‍यांमध्ये उत्कृष्टता आणि सचोटीची संस्कृती वाढवण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ वचनबद्ध आहे, असे कोकण रेल्वे महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

  • यातून जनतेत अप्रामाणिकपणा किती रुजला आहे ? ते दिसून येते.
  • जनतेत राष्ट्रप्रेम असते, तर असा विनातिकीट प्रवास करून भारतीय रेल्वेला फसवण्याचा विचारच आला नसता.