श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्री गुरूंच्या आज्ञापालनातून त्यांची शक्ती कार्यरत होत असणे

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी कुबडी उभी केल्यावर एका संतांचा अहं दूर होणे : ‘वर्ष २००१ मध्ये रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एक संत आले होते. ते त्यांच्या सिद्धीने कुबडी उभी करून दाखवत असत. ते संत साधकांना कुबडी उभी करून दाखवत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना म्हणाले, ‘‘हे आमचे साधकही करू शकतात.’’ त्यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना बोलावले आणि सांगितले, ‘‘आता तुम्ही कुबडी उभी करा.’’ तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी नुकतीच साधना चालू केली होती; पण ‘श्री गुरूंनी आज्ञा केली आहे, तर त्याचे संपूर्ण श्रद्धेने आज्ञापालन करायला हवे’, असा त्यांचा दृढ भाव होता. त्यांनी मनोमन परात्पर गुरुदेव आणि त्यांची कुलदेवी यांना प्रार्थना केली अन् कुबडी उभी केली. हे पाहून त्या संतांना असलेला अहं गळून पडला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘त्या संतांना सिद्धीचा अहं झाला आहे’, हे आधीच ज्ञात झाले होते.

१ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञेतूनच त्यांची शक्ती कार्यरत झाल्यामुळे कुबडी उभी राहिली’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेमध्ये ‘चमत्कार’, असे काही नसते. सर्व देवाच्या ऊर्जेवर चालू असते. त्यामुळे साधनेमध्ये ‘मी काही केले’, असा अहं नसतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञेमधूनच त्यांची शक्ती कार्यरत झाल्यामुळे माझ्याकडून कुबडी उभी केली गेली.

१ इ. ‘श्री गुरूंनी सेवा दिली, म्हणजेच ती सेवा करण्याची शक्तीही दिली’, अशी दृढ श्रद्धा ठेवून श्री गुरूंचे आज्ञापालन केल्यास शिष्याला साधनेसाठी शक्ती मिळणे : साधकांनी, ‘आपल्याला केवढे मोठे कार्य करायचे आहे, बरीच सेवा बाकी आहे, सेवा पुष्कळ कठीण आहे ?’, असे विचार करण्याऐवजी ‘श्री गुरूंनी मला सेवा दिली आहे, म्हणजे ती सेवा करण्याची शक्तीही त्यांनीच मला दिली आहे’, अशी पूर्ण श्रद्धा आणि भाव ठेवावा. त्यामुळे अशक्य गोष्टीही साधनेत सहज शक्य होतात. श्री गुरूंचे आज्ञापालन करण्यातूनच शिष्याला साधना करण्याची शक्ती मिळते.’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.