पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या संदर्भात पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. ‘पू. दातेआजी संत आणि साधिका यांचे बोलणे ऐकत असून त्यांचाही संभाषणात सहभाग आहे’, असे जाणवणे

‘७.७.२०२४ या दिवसापासून पू. दातेआजी (पू. (श्रीमती) निर्मला दाते (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) रुग्णाईत आहेत. तेव्हापासून पू. आजींची शुद्ध हरपली आहे. असे असूनही ‘त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवते. ७.७.२०२४ या दिवशी सौ. ज्योती दातेकाकू (पू. आजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) यांच्याशी पू. आजींविषयी बोलणे झाले. त्या वेळी ‘पू. आजी आमचे बोलणे ऐकत असून त्यांचाही त्या संभाषणात सहभाग आहे’, असे मला जाणवले.

पू. निर्मला दातेआजी

२. पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे पू. निर्मला दातेआजी यांच्याशी सूक्ष्मातून झालेले संभाषण

१३.७.२०२४ च्या रात्री ११.४५ वाजता मला सूक्ष्मातून पू. निर्मला दातेआजींचा आवाज ऐकू आला. त्या वेळी आमचा संवाद झाला. तेव्हा आमचे सूक्ष्मातून झालेले संभाषण पुढे दिले आहे.

२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समवेत असल्यामुळे काहीच त्रास होत नाही’, असे सूक्ष्मातून सांगणार्‍या पू. निर्मला दातेआजी !

पू. दातेआजी : अगं मनीषा, तू प्रतिदिन ज्योतीला भ्रमणभाष कशाला करते ? मला आता बरे वाटत आहे. तू काळजी करू नको.

पू. मनीषा पाठक : पू. आजी तुम्हाला त्रास होत आहे ना ? तुमच्या पोटात पातळ पदार्थ जाण्यासाठी नाकातून नळी घातली आहे. त्याचाही तुम्हाला किती त्रास होत असेल ? मला तुमची आठवण येते; म्हणून मी ज्योतीताईंना भ्रमणभाष करते.

पू. दातेआजी : अगं, मला काही होत नाही. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या समवेत इथेच आहेत ना ! त्यांच्यामुळे मला काही त्रास होत नाही.

२ आ. ‘पू. आजी वेगवेगळ्या लोकांत सूक्ष्मातून प्रवास करत असून तेथील वातावरण दैवी आहे’, असे त्यांनी सांगणे

पू. मनीषा पाठक : पू. आजी, तुम्ही कुठे आहात ?

पू. दातेआजी : मी वेगवेगळ्या लोकांमध्ये प्रवास करत आहे. येथील वातावरण पुष्कळ वेगळे असून दैवी आहे.

पू. (सौ.) मनीषा पाठक

३. अनुभूती

३ अ. सूक्ष्मातून पू. दातेआजींचा मधुर आवाज कानी पडून त्यांनी प्रेमाने विचारपूस करणे : १९.६.२०२४ या दिवसापर्यंत ‘पू. दातेआजी सूक्ष्मातून माझ्याशी बोलत आहेत. त्यांचा मधुर आवाज कानी पडत असून त्या प्रेमाने माझी विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवत असे.

३ आ. पू. दातेआजींचे स्मरण होताच ‘ॐ’चा नाद ऐकू येणे : २०.६.२०२४ या दिवसापासून पू. आजींचे स्मरण झाल्यानंतर पुणे सेवाकेंद्रातही मला ‘ॐ’चा नाद ऐकू येतो. त्यातील ‘म’ चा उच्चार दीर्घ असायचा. हा नाद अजूनही मला ऐकू येतो. प्रत्यक्षात पू. आजी रामनाथी आश्रमात असतात.

४. कृतज्ञता

‘पू. दातेआजी पुण्यात असतांनाही पुष्कळ वर्षे मला त्यांचा लाभलेला सहवास, त्यांच्यातील देवाप्रतीचा भाव आणि त्यांची प्रीती यांतून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आता ‘त्या रुग्णाईत असूनही सूक्ष्मातून आम्हा सर्वांना शिकवत आहेत’, याबद्दल पू. दातेआजींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच पू. आजींच्या संदर्भातील या दैवी अनुभूती मला अनुभवता आल्या’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे), पुणे (२०.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक