हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या सेवेला गेल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या कृपेने परिपूर्ण सेवा करता येणे

१. विद्युत् सेवेसंदर्भात पूर्ण माहिती नसतांनाही सद्गुरु काकांच्या प्रेरणादायी बोलण्यामुळे सेवा परिपूर्ण होणे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘वर्ष २०२१ मध्ये मी सेवेसाठी हरिद्वार येथील कुंभमेळ्यास गेलो होतो. मी विद्युत् सेवेसाठी केवळ साहाय्यक म्हणून गेलो होतो; पण तिथे विद्युत् सेवेचे दायित्व असलेले साधक तेथील हवामानामुळे रुग्णाईत झाले. मला विद्युत् यंत्रणेची परिपूर्ण माहिती नसल्याने ती सेवा मला करणे शक्य नव्हते. अशी स्थिती असतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका मी रहात असलेल्या तंबूजवळ आले आणि मला म्हणाले, ‘‘आपला एक मावळा घायाळ झाला, तर दुसर्‍याने लगेच मावळा होणे अपेक्षित आहे.’’ असे बोलून ते तेथून निघून गेले. त्यांच्या या शब्दाचा भावार्थ माझ्या लक्षात आला. मी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन विद्युत् सेवा चालू केली. जसजसे मी सेवा करत गेलो, तसतसे मला देवाने सेवेसंदर्भात पुढचे पुढचे सुचवले. त्याप्रमाणे ही सेवा परिपूर्ण झाली. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘सद्गुरूंचे प्रत्येक वाक्य म्हणजे त्यांचा संकल्पच असतो.’

२. झालेल्या चुकांमध्ये न अडकता त्यावर प्रायश्चित्त घेणे आणि त्यातून शिकून पुढे जाणे

श्री. विठ्ठल कदम

विद्युत् सेवा करतांना माझ्याकडून तेथील ‘जनरेटर’ अयोग्य पद्धतीने बंद केला गेला. त्यामुळे तंबूतील सात दंडदीप (ट्यूबलाईट) खराब झाले. सेवेच्या आरंभीच माझ्याकडून ही चूक झाली; म्हणून मला ताण आला. मी ही चूक सद्गुरु काकांना सांगितली. तेव्हा सद्गुरु काका मला म्हणाले, ‘‘आता झालेल्या चुकीचा विचार करायला नको. या चुकीतून ‘पुढे काय करायला हवे ?’, हे तुमच्या लक्षात आले ना ! आता चुकीसाठी प्रायश्चित्त घ्यायचे आणि पुढील सेवा करायची.’’ त्यानंतर आम्हाला कोणतीच अडचण आली नाही.

अशा पद्धतीने सद्गुरूंच्या शब्दांचा भावार्थ आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ही सेवा देवाने माझ्याकडून परिपूर्ण करवून घेतली. त्याविषयी मी गुरुचरणी आणि सद्गुरु चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक