गुजरातमधील वस्तू आणि सेवा कर आयुक्तांनी सातारा येथे विकत घेतले अख्खे गाव !

अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे उल्लंघन करून भूमी खरेदी !

आयुक्त चंद्रकांत वाळवी

सातारा – आयुक्त चंद्रकांत वाळवी हे गुजरातमध्ये वस्तू आणि सेवा कर आयुक्त म्हणून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. वाळवी यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील कांदाटी खोर्‍यामध्ये अख्ख्या गावासहित एकूण ६२० एकर जागा विकत घेतली आहे. जागतिक पटलावर प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणार्‍या महाबळेश्वरमध्ये वस्तू आणि सेवा कर आयुक्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमी खरेदी केल्याने संपूर्ण राज्यभर त्याची चर्चा चालू झाली आहे.

आयुक्त चंद्रकांत वाळवी हे मूळचे नंदुरबारचे रहिवासी असून सध्या गुजरातच्या कर्णावतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी महाबळेश्वरजवळील झाडणी नावाचे संपूर्ण गावच विकत घेतल्याची माहिती ‘गुजरात समाचार’ने दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ही सर्व माहिती बाहेर काढली आहे. मोरे यांच्या सांगण्यानुसार, आयुक्त वाळवी यांनी गावातील सर्व नागरिकांना, तुमची भूमी सरकारकडून प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जाणार असल्याचे सांगितले, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वन संरक्षण कायदा १९७६, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे उल्लंघन करुन भूमी खरेदी केल्या आहेत. या कायद्यांचे उल्लंघन केल्याने नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. या उल्लंघनामुळे जैवविविधतेची हानी, तसेच जलप्रदूषण आणि हवामान पालट यांसह गंभीर परिणाम होत आहेत. सध्या या भूमीच्या अंतर्गत भागात अनधिकृत बांधकामे, खोदकाम, झाडे तोडणे, अनधिकृत रस्ते, जंगलाच्या सीमेतून होणारा वीजपुरवठा यांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वाळवी यांनी खरेदी केलेल्या भूमीतील ४० एकरावर अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहे, तसेच ज्यांच्या ताब्यातून भूमी घेतली त्यांना वाळवींनी पैसेही दिलेले नाहीत. (हे खरे असेल, तर याविषयीचे अन्वेषण करून संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक) मी याविषयी चौकशी करण्यासाठी घटनास्थळी गेलो असता सरकारच्या माध्यमातून ही भूमी विकत घेतली आहे, अशी खोटी माहिती मला देण्यात आली. या भूमीचा व्यवहार कसा झाला ? याचे अन्वेषण केले पाहिजे, अशी मागणीही मोरे यांनी सातारा जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

कांदाटी खोर्‍यात ३ वर्षांपासून अनधिकृत बांधकामे आणि मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू आहे; मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रशासनातील एकाही विभागाला याचा पत्ता नाही. यावरून एकही सरकारी अधिकारी तिथे नक्की काय चालू आहे, हे पहाण्यासाठी फिरकलेला नाही. चंद्रकांत वाळवी यांच्यावर यापूर्वी भावनगर आणि गांधीनगरमध्ये कार्यरत असतांना अनेक आरोप झाले आहेत. खोटी देयके, अनधिकृत ‘टॅक्स क्रेडिट’च्या आकड्यांमध्ये फेरफार, असे गंभीर आरोप यापूर्वी वाळवींवर झाले आहेत. वाळवींमुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.