समुद्रकिनार्‍यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

 

मडगाव, १८ मे (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी बाणावली समुद्रकिनार्‍यावर धावणार्‍या २४ वर्षीय युवतीवर तेथील भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केले होते आणि या युवतीवर आता वैद्यकीय उपचार चालू आहेत. या घटनेपूर्वीही विविध समुद्रकिनार्‍यांवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मासेमार आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

बाणावली समुद्रकिनार्‍यावर भटक्या कुत्र्यांमुळे वाईट अनुभव आलेल्या रशियन युवती क्रिस्टिना म्हणाल्या, ‘‘मी पहिल्यांदाच गोव्यात आले आणि गोव्याच्या प्रेमात पडले. येथील लोकांचे आदारातिथ्य, तसेच स्वच्छ समुद्रकिनारे मला आवडले. मी बाणावली समुद्रकिनार्‍यावर सायकल चालवत असतांना माझ्यावर १० कुत्र्यांनी आक्रमण केले. स्थानिक मासेमार पेले फर्नांडिस यांनी मला या वेळी वाचवले. पर्यटनमंत्र्यांनी या समस्येवर त्वरित तोडगा काढावा.’’

स्थानिक मासेमार पेले फर्नांडिस यांच्या मते समुद्रकिनार्‍यांवर भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. समुद्रकिनार्‍यांवरील ‘शॅक्स’ बंद झाल्याने भटक्या कत्र्यांना खाणे मिळण्याचे साधन बंद झालेले आहे आणि यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. याविषयी पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे आणि ती केवळ बाणावलीपुरती मर्यादित नसून ती सर्व गोव्याला लागू पडते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासकीय धोरण निश्चित झाले पाहिजे आणि याविषयी मी मुख्यमंत्र्यांकडे बोलणार आहे.’’

संपादकीय भूमिका 

तथाकथित प्राणीप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ? पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारण्यावर बंदी घालणारे प्राणीप्रेमी माणसांवर आक्रमण करणार्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करतील का ?