विजय वडेट्टीवार यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

अधिवक्ता विशाल मोहिते-पाटील यांची चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात तक्रार

चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करतांना अधिवक्ता विशाल मोहिते-पाटील (पोलिसांच्या उजवीकडे) यांसह राष्ट्रप्रेमी नागरिक

कडेगाव (जिल्हा सांगली) – महाराष्ट्र आतंकवादी विरोधी पथकाचे प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही आंतकवादी कसाबने मारलेली नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकार्‍याच्या बंदूकीतून निघाली आहे. हे सत्य माजी विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लपवले, असे वक्तव्य काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. वास्तविक या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयात सर्व सिद्ध झालेले असतांनाही अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे पाकिस्तानधार्जिणेपणा आहे. हे वक्तव्य समाजाची शांतता भंग करणारे आणि देशभक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या विरोधात जाणीवपूर्वक लोकांच्या मनात कटूता निर्माण करणारे आहे. तरी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार अधिवक्ता विशाल मोहिते-पाटील यांनी चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात दिली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना हे लक्षात येत नाही का ? – संपादक) या प्रसंगी राष्ट्रप्रेमी सर्वश्री राजेश महाडिक, अविनाश माने, सिद्धनाथ मोहिते, आनंदराव मोरे, दत्ताजी मोहिते उपस्थित होते.