सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांना संशय

सरबजीत सिंह (डावीकडे) आणि कुख्यात गुंड अमीर सरफराज (उजवीकडे)

लाहोर (पाकिस्तान) – येथे गोळ्या झाडून ठार मारण्यात आलेला कुख्यात गुंड अमीर सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा संशय पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी व्यक्त केला आहे. यावर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सरफराज याने वर्ष २०१३ मध्ये येथील लखपत कारागृहात भारतीय नागरिक यांची हत्या केली होती.

नक्वी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये झालेल्या अनेक हत्यांमध्ये भारताचा हात असल्याचा संशय आहे; मात्र, पोलीस अजूनही या प्रकरणांचे अन्वेषण करत आहेत. त्यामुळे काहीही बोलणे घाईचे होईल.

सरफराज अद्याप जिवंत ! – वरिष्ठ पोलीस अधीक्षकाचा दावा

अमीर सरफराज याच्या हत्येच्या एका दिवसानंतर पाकच्या पंजाब प्रांताचे  वरिष्ठ पोलीस अधीक्षक सय्यद अली रझा यांनी म्हटले आहे की, सरफराज अजूनही जिवंत आहे; पण तो गंभीररित्या घायाळ आहे. त्याला उपचारांसाठी कुठे ठेववण्यात आले आहे ?, हे मात्र रझा यांनी सांगितले नाही.

या प्रकरणात भारतीय वृत्तसंस्थेने लाहोर पोलिसांचे प्रवक्ते फरहान शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगत काहीही बोलण्यास नकार दिला.

संपादकीय भूमिका

  • स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना त्याकडे न पहाता भारतावर संशय घेऊन स्वतःचे दायित्व ढकलणारे पाकचे गृहमंत्री !