संपादकीय : इराण-इस्रायल संघर्ष !

इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांचा मारा केला. यातील ९९ टक्के ड्रोन आणि रॉकेट यांना इस्रायलची ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ अन् अमेरिकन वायूदल यांनी हवेतच नष्ट केले आहेत. इराणच्या या आक्रमणामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला असून युद्धाचे ढग जमा झाले आहेत. इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला या युद्धापासून दूर रहाण्यास सांगितले आहे. इराणने इस्रायलवर आक्रमण केल्यानंतर इराणमध्ये जल्लोष चालू आहे. इराणच्या पाठोपाठ आतंकवादी संघटना हिजबुल्लानेसुद्धा इस्रायलवर रॉकेट डागण्यास प्रारंभ केला आहे. दुसर्‍या बाजूला अमेरिकेने ती इस्रायलच्या रक्षणासाठी कटीबद्ध असून सौदी अरेबिया, ब्रिटन, चीन आणि अन्य मोठ्या देशांनी इस्रायलला साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलनेही युद्धाची सिद्धता चालू केली असून युद्ध मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने आक्रमण केल्याचा दावा इराणने केला होता. इस्रायलच्या या आक्रमणामध्ये इराणचे १३ हून अधिक सैन्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत. ‘या आक्रमणाचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील’, अशी धमकी इराणने दिली होती. इस्रायलने सीरियातील दमास्कस येथील इराणच्या दूतावासावर आक्रमण करून ‘कूड्स फोर्स’ या इराणच्या सैन्याच्या गुप्तहेर आणि निमलष्करी गटातील अधिकार्‍यांना ठार केले आहे. इराणमध्ये तेथील प्रस्थापित राजवटीविरुद्ध वर्ष १९७९ मध्ये झालेल्या क्रांतीनंतर ‘कूड्स फोर्स’ या निमलष्करी गटाचा जन्म झाला. वर्ष १९७९ मधील क्रांतीनंतरच्या घोषणापत्रात इस्रायलला नष्ट करणे, हे इराणचे उद्दिष्ट राहिले आहे. इस्लामी राजवटीचे रक्षण करणे आणि सैन्यासह सत्तेचा समतोल राखणे, हे ‘कूड्स फोर्स’चे उद्देश आहेत. ‘कूड्स फोर्स’चे असे उद्देश असले, तरी त्यांचा खरा चेहरा वेगळाच आहे. इराण हा शिया देश आहे. याच भागातील सौदी अरेबिया हा सुन्नी देश आहे. शिया आणि सुन्नी यांच्यात पुष्कळ मोठा संघर्ष आहे. ते एकमेकांना शत्रूच मानतात, अशी त्यांच्यातील स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यात तणाव कायम असतो. यामध्ये विशेष महत्त्वाचे म्हणजे दोन्ही देश त्यांच्या विचारसरणीचा पुरस्कार करणे, तिचे रक्षण करणे, या भागात त्यांची विचारसरणी रुजवणे, यांसाठी काही ना काही प्रयत्न करत असतात. स्वत:चे या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील, हे प्रयत्न दोन्ही देश करत आहेत. त्यामुळे येथे संघर्षाची परिस्थिती उद्भवते.

इराणचा आतंकवादाला पाठिंबा !

इराण इस्रायलला ‘झिओनिस्ट’ म्हणजे सर्वसाधारणपणे जे ज्यूंच्या भूमीला म्हणजेच इस्रायलला मान्यता देतात ते. याचाच अर्थ इराणच्या दृष्टीने इस्रायल या देशालाच मान्यता नसण्यासारखे किंवा इस्रायलचे अस्तित्वच इराणला नको असल्याप्रमाणे आहे. इराणचे प्रमुख आयातुल्ला अली खामेनी हे सातत्याने ‘झिओनिस्टांचा पराभव करू, त्यांना नष्ट करू’ अशी भाषा करतात, म्हणजेच ‘इस्रायलला नष्ट करू’, अशी त्यांची विचारसरणी नव्हे, तर ते त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध चालू केल्यामुळे इराणच्या पोटात दुखले आणि त्याने या भागातील हिजबुल्लासारख्या आतंकवादी संघटनांना इस्रायलविरुद्ध कृती करण्यास सांगितले. या भागातील बहुतांश आतंकवादी संघटनांना इराण भरीव आर्थिक आणि अन्य साहाय्य करतो. ‘इस्रायलचा शत्रू तो इराणचा मित्र’, असे समीकरण आहे. त्यामुळे जो इस्रायलच्या विरुद्ध प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कृती करतो, त्यांना इराण साहाय्य करतो. आशियात ज्याप्रमाणे पाकिस्तान त्याच्या भूमीत अनेक आतंकवादी संघटनांना आश्रय देऊन भारताविरुद्ध आतंकवादी कारवाया करण्यासाठी उकसवतो, त्यांना साहाय्य करतो, तीच भूमिका इराण वठवत आहे.

इराण त्याच्या भूमीत आतंकवादी संघटना, आतंकवादी यांना आश्रय देत आहे. या सर्वांचा उपयोग तो त्याच्या शत्रूंना अस्थिर करण्यासाठी, या भागात त्याचा दबदबा प्रस्थापित करण्यासाठी करतो. हमास हे त्याचेच एक उदाहरण आहे. पॅलेस्टाईन येथील आतंकवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या भयावह आक्रमणामध्ये सहस्रो ज्यूंची कत्तल करण्यात आली. ‘इस्रायलविरुद्ध छेडलेले हे युद्ध आहे’, अशीच भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या आक्रमणाच्या संदर्भात घेतली आणि त्याचसमवेत लगोलग इस्रायलने भयावह प्रत्त्युत्तर देत गाझा पट्टीवर बाँबगोळ्यांचा वर्षाव चालू केला. हमासने निर्माण केलेल्या भूमीगत मार्गाचे जाळे हमासच्या आतंकवाद्यांसह नष्ट करण्याच्या मार्गावर इस्रायल आहे. या आतंकवाद्यांना साहाय्य करण्यास येणार्‍यांनाही इस्रायल नष्ट करत आहे, एवढी इस्रायलची आक्रमकता आहे. हमास आणि त्याच्या प्रमुखांना संरक्षण देण्यामागे इराणच आहे. इस्रायलचे धोरण असे आहे की, तो त्याच्यावर आक्रमण करणार्‍यांना जराही सोडत नाही. हमासच्या आतंकवाद्यांना इराणकडून अद्याप साहाय्य चालू आहे, हे लक्षात आल्यावर इस्रायलकडून इराणसह, अन्य शेजारील देशांतील आतंकवादी तळांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.

इराणची इस्रायलविरोधी भूमिका आणि इस्रायलची आक्रमकता यांमुळे दोघांमध्ये शीतयुद्धासारखी परिस्थिती आहे. इराण त्याच्या आजूबाजूच्या इस्लामी देशांना इस्रायलविरुद्ध कुरापती करण्यास भाग पाडतो, याच वेळी इस्रायलच्या पाठीशी अमेरिका आणि ब्रिटन, तसेच अन्य युरोपीय देश उभे रहातात. इस्रायल-हमास संघर्षात जर इराण उतरेल, तर इस्रायलवर त्याचा गंभीर परिणाम होईल, हे लक्षात घेऊन अमेरिका आणि ब्रिटन यांनी त्यांच्या युद्धनौका इस्रायलजवळच्या समुद्रात आणून उभ्या केल्या होत्या. याचा परिणाम चांगलाच झाल्यामुळे इराण थेट इस्रायलविरुद्धच्या युद्धात उतरलेला दिसला नाही; मात्र आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक साहाय्य पुरवून तो अप्रत्यक्षरित्या सहभागी झाला आहेच. इराणने शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे आता थेट आक्रमण करून त्याची युद्धसज्जता झाल्याचे लक्षात आणून दिले आहे. अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देश यांना खरी भीती आहे ती इराणमधील अणूबाँबची ! ही आण्विक शस्त्रे इराणने जर आतंकवाद्यांना दिली, तर इस्रायलचेच काय, कुठल्याही पाश्चात्त्य देशांचेही काही खरे नाही. ‘आतंकवाद्यांच्या हातात आण्विक शस्त्रे, म्हणजे माकडाच्या हातात कोलीत’, अशी परिस्थिती ! यामुळे अमेरिकेने इराणच्या आण्विक कार्यक्रमावर निर्बंध घालत दबावतंत्राचाही उपयोग केला आहे. आता इराण-इस्रायल संघर्ष शीतयुद्धाच्या पुढे गेला आहे. भारताने तटस्थ भूमिका घेतली असली, तरी त्याला त्याची भूमिका मांडावीच लागणार आहे. आज, उद्या किंवा येते काही दिवस वा काही महिन्यांत तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडाल्याविना रहाणार नाही. भारताने त्यांच्यातील संघर्षातून बोध घेऊन शेजारील शत्रू देशांविरुद्ध सज्ज रहाणेच हितकारी !

इराण-इस्रायल संघर्षाची स्थिती लक्षात घेऊन भारताने पाक आणि चीन या शत्रूदेशांविरुद्ध युद्धसज्ज रहाणे आवश्यक !