प.पू. प्रमोद केणे काकालिखित आध्यात्मिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

धाराशिव आणि गिरगाव येथेही झाला प्रकाशन सोहळा !

रामनाथ (जिल्हा रायगड), ११ एप्रिल (वार्ता.)- गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चौल (अलिबाग) येथे ‘जय गिरनारी शिव दत्त मंदिर ट्रस्ट’चे प.पू. प्रमोद केणेकाका यांनी लिहिलेल्या ‘वेड्या पिराची आत्मगाथा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. अशाच प्रकारचा प्रकाशन सोहळा धाराशिव आणि गिरगाव येथेही पार पडला.

चौल येथे अलीबाग येथील ज्येष्ठ अधिवक्ता दत्तात्रेय जोशी, सुप्रसिद्ध फौजदारी अधिवक्ता अंकित बंगेरा, मुंबई येथील निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मधुकर बेलोसे, ज्येष्ठ सेवेकरी श्री. हेमंत दांडेकर, सक्रिय सेवेकरी डॉ. नितीन गांधी उपस्थित होते. चौल येथील कार्यक्रम दीपप्रज्वलन करून आरंभ झाला. सांगतेच्या वेळी श्री. हेमंत दांडेकर यांनी ‘वन्दे मातरम् ।’ म्हटले.

‘ईश्वरप्राप्तीसाठी वेडेपणाची आवश्यकता असते. ईश्वरासाठी वेडे व्हा आणि परमानंदाची अनुभूती घ्या. वेडेपणात स्वार्थ शिल्लक रहात नाही. जमाखर्चाचा ताळमेळ बघितला जात नाही. तेव्हा फक्त एकच ध्यास उरतो, तो म्हणजे गुरुदर्शनाचा ईश्वरप्राप्तीचा ! या ध्यासात मीराबाई वेडी झाली होती. ज्यामुळे विषही अमृत बनले.

संतांचा इतिहास बघितला, तर हे सर्व संत सकारात्मक वेडेच होते आणि हाच वेडेपणा ईश्वराला भावतो’, असे मार्गदर्शन प.पू. केणेकाका यांनी या वेळी केले.

भगवंतप्राप्ती आणि भक्ती यांच्या दृष्टीने ग्रंथसंपदा पथदर्शक ! – दत्तात्रेय जोशी

‘हा ग्रंथ सर्वांना आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायक आहे. कोणत्याही प्रसंगात आपले आत्मस्थैर्य डळमळीत होऊ न देता भगवंतप्राप्ती कशी करायची आणि भक्ती कशी दृढ करावी, हे कळण्यासाठी ही ग्रंथसंपदा पथदर्शक ठरेल’, असे मनोगत रामनाथ (अलीबाग) येथील अधिवक्ता श्री. दत्तात्रेय नारायण जोशी यांनी ग्रंथात मांडले आहे.