राजसत्ता आणि धर्मसत्ता !

उत्तरप्रदेशातील बरेली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘जेव्हा एखादी धार्मिक व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसते, तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसून येतात’’. या वेळी त्यांनी विख्यात तत्त्वज्ञ प्लेटो यांच्या तत्त्वज्ञानाचा दाखला दिला. प्लेटो यांच्या मते सत्तेचा प्रमुख हा धार्मिक असावा; कारण धार्मिक व्यक्तीचे जीवन केवळ आनंदाचे नसते, तर ते त्याग आणि समर्पण यांचे प्रतीक असते. देशाच्या आजच्या स्थितीचा अभ्यास केल्यास प्लेटो यांचे विधान सध्याच्या घडीला चपखल बसणारे आहे. ‘ज्या ठिकाणी धर्मसत्ता आणि राजसत्ता हे एकत्र येऊन राज्यकारभार केला जातो, त्या ठिकाणी सुराज्य अवतरते’, असेही म्हटले जाते. आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याचे दाखले दिले जातात. राजाने राजधर्माचे पालन करतांना आपले कुटुंबीय आणि राज्यातील जनता यांमध्ये दुजाभाव करू नये, हे प्रभु श्रीरामांनी विविध प्रसंगातून दाखवून दिले. ‘धर्माचे अधिष्ठान ठेवून राज्यकारभार कसा करावा ?’, याचा परिपाठच सार्‍या जगाला त्यांनी घालून दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करत राज्यकारभार केला. त्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते. कठीण प्रसंगांत निर्णय घेतांना ते त्यांचा सल्ला घेत असल्याचे दाखले शिवचरित्रात आढळतात. राजसत्तेला धर्मसत्तेची जोड मिळाली की, राज्यातील प्रजाही गुण्यागोविंदाने नांदते. जुलमी नंद घराण्याचा विनाश करून आर्य चाणक्य यांनी मगध देशाच्या गादीवर चंद्रगुप्त मौर्य यांना बसवले आणि स्वतः त्यांचा महामंत्री म्हणून राज्यकारभार पाहिला. सम्राट चंद्रगुप्त यांनी आर्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य काबूलपर्यंत वाढवले. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या बहुतांश नेतेमंडळींनी राजकीय सत्तेचा वापर स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केला. जनसेवेच्या नावाखाली ही नेतेमंडळी जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत येनकेन प्रकारेण धन गोळा करत असतात.

आजही सत्तेत असणार्‍या काही मंत्र्यांची नावे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत गुंतलेली आहेत. याउलट धार्मिक प्रवृत्तीच्या राजकीय व्यक्तीला ‘आपल्या प्रत्येक कृतीकडे भगवंताचे लक्ष आहे’, याची जाणीव असते. ‘गैरमार्गाने धन कमावणे, हे पापकर्म असून त्या प्रत्येक रुपयाचा हिशोब आपल्याला मृत्यूनंतर भगवंताला द्यावा लागणार आहे’, याची जाण असते. धार्मिक प्रवृत्तीच्या नेत्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजलेली असतात. त्यामुळे सत्ता ही भोगासाठी नसून आपण जनतेचे सेवक आहोत, याची त्याला जाण असते ! यासाठी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा संगम होणे प्रजेसाठी नेहमीच अनुकूल असते. मतदारांनींही हे लक्षात ठेवावे !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.