‘सनातन प्रभात’ हे आंतरिक परिवर्तनाचे माध्यम ! – योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक

‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी श्री. योगेश जलतारे यांची नियुक्ती !

रामनाथी, ९ एप्रिल (वार्ता.) : ‘सनातन प्रभात’ हे आंतरिक परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन ‘सनातन प्रभात’चे नवनिर्वाचित समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांनी केले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. गुरुकृपेने मिळालेल्या या सेवेच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य उत्तरोत्तर वाढवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

श्री. योगेश जलतारे

येथील ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘सनातन प्रभात’चे मावळते समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी श्री. जलतारे यांच्याकडे ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक म्हणून पदभार सुपुर्द केला आणि शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘सनातन प्रभात’चे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांनीही श्री. जलतारे यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक उपस्थित होते.

श्री. योगेश वामन जलतारे यांचा थोडक्यात परिचय !

मूळचे अकोला येथील असलेले श्री. जलतारे यांनी वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेस आरंभ केला. वर्ष २००० पासून ते पूर्णकालीन साधक म्हणून कार्यरत आहेत. ‘सनातन प्रभात’च्या मुख्य कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे दायित्व त्यांनी काही काळ सांभाळले आहे. त्यांच्या २६ वर्षांच्या साधनाकाळात सनातन प्रभात, तसेच धर्मप्रसाराच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. पूर्णकालीन साधक झाल्यानंतर त्यांनी आरंभी ठाणे येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संस्थास्तरीय लेखा विभागात सेवा केली. त्यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’साठी विविध समाजोपयोगी आणि कायदेविषयक लेखांचे संकलन केले. तसेच ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य असलेल्या सूक्ष्म-जगतातील घटनांचे वार्तांकन, तसेच साधनाविषयक लिखाण केले. मागील काही वर्षांपासून ते ‘सनातन प्रभात’साठी राष्ट्र-धर्म प्रबोधनपर लघुपटांच्या निर्मितीची सेवा करत आहेत.