‘सेमीकंडक्टर’च्या क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’तेकडे…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील ‘सेमीकंडक्टर’ची निर्मिती करणार्‍या ३ प्रकल्पांचे उद्घाटन केले. हा एक अत्यंत ऐतिहासिक असा क्षण होता. या तीनपैकी दोन प्रकल्प गुजरातमध्ये, तर एक आसाममध्ये उभारण्यात येणार आहे. ‘टाटा कंपनी’कडे यापैकी २ प्रकल्प आहेत, तर तिसरा प्रकल्प ‘मुरुगन कंपनी’कडे आहे. या निमित्ताने ‘सेमीकंडक्टर’च्या उत्पादन क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी अनुमाने १५ अब्ज डॉलर्स (१ लाख २६ सहस्र कोटी रुपये) इतका व्यय करण्यात येणार असून त्यातून ५ लाख जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर,परराष्ट्र धोरण विश्लेषक

(टीप : ‘सेमीकंडक्टर’ म्हणजे अर्धसंवाहक. ‘सेमीकंडक्टर’ हा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आणि उपकरणे यांमधील महत्त्वाची सामुग्री.)

१. २१ वे शतक तंत्रज्ञानाचे म्हणजे ‘सेमीकंडक्टर’चे

२० वे शतक हे प्रामुख्याने तेलाचे शतक होते. या शतकाचे संपूर्ण राजकारण हे कच्च्या तेलाचा पुरवठा आणि तेलविहिरींवरील मालकी हक्क यांभोवती फिरत होते. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धानंतर राजकारणाचे प्रमुख केंद्र पश्चिम आशिया बनला. २१ व्या शतकामध्ये राष्ट्रांची उद्दिष्टे पालटली आहेत. हे शतक तंत्रज्ञानाचे (‘टेक्नॉलॉजी’चे) युग आहे. त्यातही ‘सेमीकंडक्टर्स’ना या युगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. किंबहुना ‘२० व्या शतकातील तेलाची जागा २१ व्या शतकात ‘सेमीकंडक्टर्स’नी घेतली आहे’, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही; कारण भ्रमणभाष संच, संगणक, भ्रमणसंगणक, वैद्यकीय क्षेत्र, वाहननिर्मिती, बँकिंग (अधिकोष), संरक्षण क्षेत्र, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) या जीवनाशी निगडित सर्वच क्षेत्रांमध्ये ‘सेमीकंडक्टर’, म्हणजेच ‘मायक्रोचिप’चा वापर केला जात आहे.

२. प्रगत देश ‘सेमीकंडक्टर’ उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर

सेमिकंडक्टर चे प्रतींनिधिक छायाचित्रं (स्त्रोत: https://ism.gov.in/)

पूर्वीच्या काळी एका पूर्ण खोलीमध्ये बसेल इतका संगणक असायचा; पण वर्ष २०१४ मध्ये ‘आयफोन ६’ आला, तेव्हा एका छोट्याशा ‘मायक्रोचिप’मध्ये संगणकातील सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. त्यामुळे आज संपूर्ण जगभरात ‘सेमीकंडक्टर’च्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांचे प्रयत्न जोरदारपणे चालू झालेले दिसत आहेत. विशेषतः प्रगत देश ‘सेमीकंडक्टर’ उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठीच्या योजना आखत आहेत. आजवर भारत या स्पर्धेमध्ये पुष्कळ मागे होता. विशेष म्हणजे भारतामध्ये १९६० च्या दशकामध्ये ‘सेमीकंडक्टर’चे उद्योग चालू करण्यासारखी परिस्थिती होती; परंतु त्या वेळी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. याउलट जपान, अमेरिका, चीन, तैवान यांसारख्या देशांनी त्यामध्ये बरीच मोठी झेप घेत या संपूर्ण बाजारपेठेवर स्वतःचा प्रभाव वाढवत मक्तेदारीच सिद्ध केली. विशेषतः तैवानचा उल्लेख यामध्ये अग्रक्रमाने करावा लागेल; कारण आज जगभरात सिद्ध होणार्‍या ‘सेमीकंडक्टर्स’पैकी जवळपास ८० ते ९० टक्के ‘मायक्रोचिप्स’ तैवानमध्ये सिद्ध होतात.

३. ‘सेमीकंडक्टर’विषयी जगाचे परावलंबित्व दूर करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न

४ वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळित झाली. ‘मायक्रोचिप्स’ ही या पुरवठा साखळीची एक महत्त्वाची कडी आहे. कोरोना महामारीच्या काळात या ‘सेमीकंडक्टर’चा पुरवठा खंडित झाल्यामुळे वाहन उद्योगासह अनेक उद्योगांना पुष्कळ मोठी हानी सहन करावी लागली. वर्ष २०२०-२१ या काळात भारतामध्ये बहुतांश वाहन कंपन्यांकडे कारसाठीची मागणी होती; पण ती देण्यासाठी कारखान्यांमध्ये कारची निर्मिती पूर्णत्वाला गेलेली नव्हती. यामागचे कारण ‘सेमीकंडक्टर’चा अपुरा पुरवठा, हे होते. चीन, जपान आणि तैवान या देशांवर ‘सेमीकंडक्टर’विषयी जगाचे परावलंबित्व असल्याने आणि तेथे दळणवळण बंदीमुळे सर्वच उद्योग बंद पडले. त्यामुळे कोरोना महामारीच्या नंतरच्या काळात अनेक देशांनी या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करायला प्रारंभ केला.

४. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यानंतर ‘सेमीकंडक्टर’ निर्मितीत भारतात गती प्राप्त

दुसरे म्हणजे चीनसारख्या एकाधिकारशाही असणार्‍या ‘रिव्हिजनिस्ट’ (सुधारणावादी) देशाविषयीची साशंकता कोरोना महामारीच्या काळात प्रचंड वाढीस लागली. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये चीनला पर्याय ठरणारा देश कुणी असू शकतो का ? याचा शोध सातत्याने पश्चिमी जगाकडून घेतला जाऊ लागला. त्या दृष्टीकोनातून भारताकडे हे देश पहात आहेत. त्यामुळे भारताने सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात पुढाकार घेतल्यास त्याला पश्चिमी देश समर्थन करण्यास सिद्ध आहेत. विशेषतः अमेरिकेचीही यामध्ये साथ मिळू शकते. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असता तेथे ‘मायक्रॉन’ या कंपनीशी ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. त्यानंतर ‘सेमीकंडक्टर’ निर्मितीच्या एकूणच मुद्याला भारतात गती प्राप्त झाली. गेल्या काही वर्षांपासून भारत यासाठी प्रयत्नशील आहेच. भारतातील अडचणींमुळे प्रकल्पाला त्याला गती मिळत नव्हती. मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यानंतर ती मिळाली.

५. ‘सेमीकंडक्टर’ निर्मितीत भारताचा पुढाकार

‘सेमीकंडक्टर’ निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ३ टप्पे आहेत. पहिला म्हणजे ‘डिझायनिंग’ (आरेखन). हे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण असल्याने त्यासाठी अत्यंत कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांची आवश्यकता भासते, तसेच यासाठी संशोधन आणि विकासही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. दुसरा टप्पा आहे ‘मॅन्युफॅक्चरींग’ (उत्पादन), म्हणजे चिपमधील सुटे भाग सिद्ध करणे आणि तिसरा टप्पा ‘असेम्ब्लिंग’ (जोडणी करणे), म्हणजेच हे सर्व सुटे भाग एकत्र जोडून चिप सिद्ध करणे. यापैकी ‘डिझायनिंग’च्या क्षेत्रात भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत; पण हे ‘डिझायनिंग’ ते भारतासाठी करत नाहीत. अमेरिकेतील ‘इंटेल’सारखे आस्थापन, जपानची आस्थापने किंवा पश्चिमी देशातील आस्थापने यांच्यासाठी अनेक भारतियांकडून हे काम केले जाते. उत्पादन आणि जोडणी करणे या क्षेत्रात फारसे भारतीय नाहीत.

आज देश ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून ‘उत्पादन केंद्र’ बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. भारत आज भ्रमणभाष उत्पादनाच्या क्षेत्रात पुष्कळ पुढे गेला आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ‘भ्रमणभाष उत्पादक देश’ म्हणून आज भारताने स्थान मिळवले आहे. भारताने गतवर्षी ११ अब्ज डॉलर्सचे (९१ सहस्र ३०० कोटी रुपयांचे) भ्रमणभाष संच निर्यात केले. ‘सॅमसंग’ आस्थापनाचे सर्वच भ्रमणभाष संच भारतात बनत आहेत. ‘ॲपल’ आस्थापनाचे जवळपास २५ टक्के भ्रमणभाष भारतात सिद्ध केले जात आहेत. भारताला येत्या काही वर्षात भ्रमणभाष संचाच्या निर्यातीचा आकडा ५० अब्ज डॉलर्स पर्यन्त  (४ लाख १५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत) न्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण संरक्षण आणि इलेट्रॉनिक क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहोत. या तिन्ही क्षेत्रांमध्ये ‘सेमीकंडक्टर’ हा आत्मा आहे. भारत सद्यःस्थितीत तैवान, चीन आणि जपान आदी देशांवर विसंबून आहे. हे परावलंबित्व न्यून करत स्वावलंबी बनण्यासाठी भारताने यामध्ये पुढाकार घेतला आहे; कारण भविष्यात ‘सेमीकंडक्टर’च्या अपुर्‍या पुरवठ्याचा परिणाम भारताची अर्थव्यवस्था आणि उद्योग यांवर होता कामा नये.

६. भारताच्या पुढे आव्हाने कोणती ?

‘सेमीकंडक्टर’च्या क्षेत्रात अनेक आव्हाने असली, तरी भारताकडे कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मुबलक असल्याने या क्षेत्रात प्रगती करणे आपल्यासाठी फारसे कठीण ठरणारे नाही. अलीकडेच केंद्रीय मंत्री (श्री.) अश्विनी वैष्णव यांनी म्हटले, ‘भारत या वर्षाच्या अखेरीस पहिली स्वदेशी ‘सेमीकंडक्टर चिप लाँच’ करण्याचा साक्षीदार असेल.’ ‘सेमीकंडक्टर’ निर्मितीच्या क्षेत्रातील वाटचाल ही आव्हानात्मक असणार आहे. विशेषतः यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा सक्षम असणे आवश्यक असते. यामध्ये वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि ‘इंटरनेट केबल्स’चे जाळे यांचा समावेश होतो. भारत गेल्या काही वर्षांत  पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रचंड वेगाने काम करत आहे. जवळपास १.४ ट्रिलीयन डॉलर्सचे (७६ लाख ५० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) प्रकल्प भारतात राबवले गेले आहेत. त्यामुळे गुजरात आणि आसाम येथील या प्रकल्पांना पाणी अन् वीज पुरवठा अखंडित कसा राहील, यासाठी विशेष काळजी घेतली आहे. आज भारत स्वतःची प्रतिमा पालटण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या काही वर्षांत जगाचे ‘बॅक ऑफिस’ (व्यवसायाला साहाय्यभूत घटक) म्हणून भारत पुढे आला. आता भारत उत्पादन क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी ‘टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डिकेड’ (तंत्रज्ञानावर आधारित दशक) असा शब्दप्रयोग वापरला आहे. मागील दशक हे ‘सामाजिक माध्यमांचे दशक’ म्हणून गाजले. अमेरिकन आस्थापनांची मक्तेदारी असणार्‍या फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांनी संपूर्ण विश्व व्यापले. आताचे दशक हे ‘मायक्रोचिप’चे असणार आहे.  पंतप्रधान मोदींनी याप्रसंगी ‘इंडस्ट्री ४.०’कडेही (चौथी औद्योगिक क्रांती) लक्ष वेधले. मागील ३ औद्योगिक क्रांतींमध्ये भारत प्रेक्षक म्हणून पहात होता. त्याचा त्याला मोठा फटका बसला.

७. भारताने संशोधन आणि विकास यांवर भर देणे आवश्यक !

आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचा एक मोठा भाग बनण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने भारत ‘सेमीकंडक्टर्स’च्या निर्मितीकडे पहात आहे. येणार्‍या काळात भारताने या क्षेत्रात येणार्‍या आस्थापनांची उभारणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताला या क्षेत्रातील ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ची ‘इकोसिस्टीम’ (संशोधन आणि विकास परिसंस्था) सिद्ध करायची आहे. या ‘इकोिसस्टीम’मध्ये सेमीकंडक्टर निर्माण होणार आहेत. त्यासाठी मुलांना उद्युक्त करणे आवश्यक आहे. अमेरिकेमध्ये सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात संशोधन करणार्‍या अनेक प्रयोगशाळा आहेत. पंतप्रधान मोदींनी अमेरिका भेटीच्या वेळी त्यांना भेटही दिली होती. अशा प्रयोगशाळा भारतात निर्माण कराव्या लागतील. यासाठी संशोधन आणि विकास यांवर होणारा व्यय वाढवावा लागेल. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जाण्याच्या प्रवासात ‘सेमीकंडक्टर्स’च्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचे असेल, तर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास यांवर भर द्यावा लागणार आहे. तूर्त भारताने या विषयामध्ये केलेला प्रारंभही स्वागतार्ह आहे.   (३.४.२०२४)