भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने : काम लवकर पूर्ण करण्याची भाविकांची मागणी !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या सांडपाण्याचे प्रकरण !

कोल्हापूर – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या भुयारी गटारीची वाहिनी दुरुस्ती करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम सध्या चालू आहे. ऐन उन्हाळ्यात हे काम काढल्याने मंदिराच्या बाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे बाहेरील मोठ्या परिसरात मंडप घालणे शक्य होत नाही. त्यामुळे भाविकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तरीही हे काम सध्या संथगतीने चालू असून ते लवकर पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात चालू असलेले भुयारी गटार योजनेचे काम

१. जुलै २०२० मध्ये मंदिराच्या परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला. कुंड बर्‍यापैकी खुले झाल्यावर मंदिराचे पूर्व द्वार आणि त्याखालून सांडपाणी आत येते अन् हे सांडपाणी थेट मनकर्णिका कुंडात मिसळत असल्याचे लक्षात आले. सांडपाण्याची ही वाहिनी दुरुस्त करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम महानगरपालिकेचे होते; मात्र जवळपास ३ वर्षे त्यासाठी महानगरपालिकेला निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कुंड खुले होऊनही त्याचा विशेष उपयोग नव्हता. अखेर जिल्हा नियोजन समितीकडून हे काम करण्यासाठी महानगरपालिकेला अडीच कोटी रुपये संमत झाले आणि त्याच्या कामाची निविदा गत मासात निघून तब्बल ४ वर्षांनंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला.

भुयारी गटार योजनेचे काम चालू असल्याने बाजूला काढून ठेवलेले ‘बॅरिकेट्स’

२. एप्रिल-मे हे उन्हाळ्याचे दिवस असून मंदिरात जाण्यासाठी बाहेर जी रांग असते, त्यातील भाविकांना ऊन लागू नये; म्हणून बाहेर मंडप घालण्यात येतो; मात्र भुयारी गटारीच्या खोदकामामुळे हा मंडप घालणे शक्य होत नाही. तसेच रांगेसाठी बाहेर जे ‘बॅरिकेट्स’ लावण्यात येतात, तेही नाईलाजास्तव काढून ठेवण्यात आले आहेत.

३. भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर मनकर्णिका कुंडात गटारीचे पाणी मिसळणे बंद होणार आहे. त्यानंतर कुंडाच्या संवर्धनाचे पुढील काम चालू होणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

काही प्रतिक्रिया

१. या संदर्भात ‘अखिल भारत हिंदू महासभे’चे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे म्हणाले, ‘‘श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाखाठी सहस्रो भाविक येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस पहाता हे काम तातडीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. आता सुट्यांच्या कालावधी चालू होत असून भाविकांची संख्या वाढत जाईल. तरी काम लवकर पूर्ण न झाल्यास प्रसंगी आम्ही आंदोलन करू.’’

२. या परिसरात असणारे एक दुकानदार म्हणाले, ‘‘बाहेरून आलेल्या भाविकांना या कामामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नेमके मंदिरात कुठल्या मार्गाने प्रवेश करायचा ?, हे लक्षात येत नाही. भुयारी गटारीसाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्डयांमुळे लहान मुलेही आत पडण्याचा धोका आहे, तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

सध्या उन्हाचे वाढते प्रमाण पहाता मंदिर परिसरात भाविकांचे पाय भाजू नयेत, यासाठी दर्शन रांगेतील भूमीवर पांढरा रंग देणे, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक प्रमाणात करणे आवश्यक आहे.