आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’च्या कामाची पहाणी केली
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ अफझलखान वधापासून शाहिस्तेखानाची बोटे तोडण्यापुरता मर्यादित नाही. हिंदवी स्वराज्याचे निर्माण म्हणून त्यांच्या इतिहासाचे दर्शन शिवसृष्टीच्या माध्यमातून व्हावे. राज्यविस्तार करण्याची शिकवण त्यांनी दिली. छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पेतून आणि ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भागवत यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. २१ एकर परिसरामध्ये चालू असलेल्या कामांची माहिती घेतली. पहिल्या टप्प्याच्या झालेल्या कामांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम यांनी उपस्थितांना ‘शिवसृष्टी’च्या प्रकल्पाची माहिती दिली. त्या वेळी संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.