भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे विधान !
नवी देहली – गेल्या ४ वर्षांपासून पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे. संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रणे रेषेवर (३ सहस्र ४८८ कि.मी. सीमेवर) आपले सैन्य तैनात आहे, असे आत्मविश्वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी येथे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.
१. जनरल पांडे पुढे म्हणाले की, आम्ही पूर्व लडाखमधील परिस्थितीवर सैनिकी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या २१ फेर्या झाल्या आहेत. सध्याच्या समस्येवर संवादातूनच तोडगा निघू शकतो.
२. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात धोका (त्रास) थोडा वेगळा असतो. आमच्या पाश्चात्य प्रतिस्पर्ध्यासारख्या आमच्या उत्तरेतील प्रतिस्पर्ध्याच्या संदर्भात मी एवढेच म्हणेन की, आमची तयारी फार उच्च आहे. आणीबाणीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा शस्त्रसाठा आहे, याचीही आम्ही निश्चिती केली आहे. आमची प्रतिसाद यंत्रणाही भक्कम आहे.