सातारा, १८ मार्च (वार्ता.) – मागील काही कालावधीत निवडणुकांशी संबंधित गुन्हे नोंद झाले आहेत. त्या गुन्ह्यात असलेल्या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये अनुमाने ४ सहस्र ५०० हून अधिक संशयितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक शेख पुढे म्हणाले, ‘‘अनुमतीपत्रधारक शस्त्र बाळगणार्यांकडूनही निवडणूक कालावधीत शस्त्र शासनाधिन करून घेण्यात येते, तसेच शहरामध्ये सीमा सुरक्षा दलाची तुकडी आली असून शहरातील वेगवेगळ्या भागांत पथसंचलन चालू केले आहे. शहरातील काही भागांत रात्रीच्या वेळी गस्त, तसेच ‘कोंबिंग ऑपरेशन’ (धरपकड करणे) चालू केले आहे. गुन्हेगारांची सूची सिद्ध करून त्यांना १४४, १०७, ५५, १५१ कलमांखाली नोटीस देण्यास प्रारंभ केला आहे. आवश्यकतेनुसार प्रतिबंधित (बाऊंड डाऊन) करण्यासही प्रारंभ केला आहे. प्रत्येक पोलीसबूथला आवश्यक तेवढे मनुष्यबळ देण्याची सिद्धता आम्ही केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी मनुष्यबळाची कोल्हापूर परिक्षेत्राकडे मागणी करण्याचे नियोजन केले आहे, तसेच राज्य राखीव दल, होमगार्ड यांचेही संख्याबळ उपयोगात आणण्याचे नियोजन केले आहे. येत्या काळात मद्य, पैसेवाटप, अमली पदार्थांची तस्करी यांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळी भरारी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.’’