Ehsan Ahmed Ghar Wapsi : प्रयागराज येथील प्रा. डॉ. एहसान अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील एहसान अहमद नावाच्या प्राध्यापकाने नुकतीच घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील. एहसान अहमद हे ‘सी.एम्.पी. पदवी महाविद्यालया’त इंग्रजी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून वर्ष २०२० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. याविषयी बोलतांना ते म्हणाले की, मी घरवापसी केल्यानंतर एका हिंदु महिलेशी विवाह केला. त्यांच्या पत्नीही एका महाविद्यालयात शिकवतात. अहमद आता कागदोपत्री स्वत:चा धर्म आणि नाव पालटण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

१. प्रशासकीय अधिकार्‍यांना दिलेल्या अर्जात त्यांनी म्हटले आहे, ‘रा.स्व.संघाच्या संपर्कात आल्यावर मला हिंदु धर्माविषयी पुष्कळ काही समजले. मला हिंदु धर्मात अनेक गुण दिसले आणि या गुणांमुळेच मी स्वेच्छेने हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मी विचारपूर्वक आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता हा निर्णय घेतला आहे. मला माझे नाव एहसान अहमदवरून अनिल पंडित करायचे आहे.’

२. याविषयी प्रयागराजच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पूजा मिश्रा म्हणाल्या की, एहसान अहमद यांच्या घरवापसीची कागदपत्रे आणि अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यानंतर एहसान अहमद यांना धर्मांतराचे प्रमाणपत्र दिले जाईल. यानंतर ते त्यांच्या ओळखपत्रांमध्ये स्वत:चे नाव पालटू शकतील.

३. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एहसान अहमद यांच्यावर बराच काळ हिंदु धर्माचा प्रभाव होता. ते श्री हनुमानाचे भक्त असून अनेकदा मंदिरात जाऊन प्रार्थना करत असत.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्माची शिकवण आणि अद्वितीय मूल्ये यांनी प्रभावित होऊन आज सहस्रावधी लोक हिंदु बनत आहेत. यासाठी हिंदूंना कधीच कुणाला कशाचेही आमीष दाखवावे लागत नाही ! यातूनच हिंदु धर्माचे वेगळेपण उठून दिसते !