कर्मचार्‍यांचा पाट्याटाकूपणा !

काही दिवसांपूर्वी मी माझ्या ‘पासपोर्ट’च्या (पारपत्र) नूतनीकरणासाठी सरकारी कार्यालयात गेले होते. तेथे एक शेतकरी पती-पत्नी त्यांचा नवीन ‘पासपोर्ट’ काढण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे दिली. त्याने कागदपत्रे बघितल्यानंतर त्यांना त्यातील चुका सांगून ‘तुम्ही तुमच्या कागदपत्रातील त्रुटी दुरुस्त करून आणा’, असे सांगितले. कागदपत्रांमधील चुका पुढीलप्रमाणे होत्या. आधारकार्डवरील त्यांच्या नावातील स्पेलिंग चुकले होते, तसेच त्यांचे नाव जन्मदाखल्यावर ‘शांता’ होते, तर विवाहानंतरच्या कागदपत्रावर ‘शांताबाई’ असे होते. यामध्ये ‘शांता’ आणि ‘शांताबाई’ या एकच आहेत, यासाठी त्यांना कागदपत्र हवे होते, तर आधारकार्डवरील स्पेलिंग दुरुस्त करून आणावे लागणार होते. या दोन चुका त्या सामान्य शेतकरी कुटुंबियांसाठी मात्र अनाकलनीय झाल्या होत्या. सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या दृष्टीने ते नियमांना बांधील होते. जोपर्यंत सर्व नावे जुळत नाहीत, तोपर्यंत ते कागदपत्रे जमा करून घेऊ शकत नव्हते. शेतकरी पती-पत्नीची मुलगी अमेरिकेमध्ये आहे. तिच्या आग्रहास्तव हे दोघे जण पारपत्र बनवण्यासाठी आले होते. आई-वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांनी कधी सरकारी कार्यालयाची पायरी यासाठी चढली नव्हती. आता मुलीला भेटण्यासाठी जायचे, तर हे सर्व केल्याविना सातासमुद्रापलीकडील मुलीला भेटायला जाणे शक्य नाही.

आधारकार्डवरील नावांमधील स्पेलिंग चुकणे, पत्ता चुकणे किंवा अन्य चुका या सर्वसामान्य आहेत. या चुका व्यक्ती जेव्हा सरकारी कार्यालयात काही कारणास्तव कागदपत्रे जमा करण्यासाठी जाते, तेव्हाच त्याला समजतात. त्या वेळी चूक कुणाची ? हा प्रश्न असतो, तसेच या चुका दुरुस्त करणेही सहज सोपे नाही. त्यासाठीची प्रक्रियाही क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्यातही ग्रामीण भागातून शहरामध्ये येणार्‍या व्यक्तींसाठी तर या गोष्टी पुष्कळच त्रासदायक आहेत. भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते. एका स्पेलिंगची चूक पुढे त्या व्यक्तीला किती त्रासदायक होते, याची कल्पना त्या वेळी काम करणार्‍या कर्मचार्‍याला येत नाही. तो त्याचे काम पाट्याटाकूपणे करून मोकळा होतो; परंतु नंतर निस्तरावे लागते, ते अशा सामान्य व्यक्तींना. या सर्व गोष्टी पुष्कळ कष्टदायक होतात आणि अशिक्षितांना तर त्या अधिकच. येथे पारपत्र काढण्यासाठी ‘शांता’ आणि ‘शांताबाई’ एकच आहेत, हे दाखवण्यासाठीची कागदपत्रे मागतात; परंतु भारतामध्ये पारपत्राविना घुसखोरी करणारे मात्र मोकाट रहातात, हे आणखी एक अनाकलनीय !

– वैद्या (कु.) सुश्री माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.