‘सनातन प्रभात’ हिंदूंमध्ये महाराणा प्रताप यांच्यासारखे शौर्य निर्माण करत आहे ! – प.पू. देवबाबा

कर्नाटकच्या मंगळुरू आणि उजिरे येथे कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा !

डावीकडून सौ. मंजुळा गौडा, दीपप्रज्वलन करतांना प.पू. देवबाबा, श्री. मधुसूदन अयार आणि श्री. प्रशांत हरिहर

मंगळुरू (कर्नाटक) – हिंदूंमध्ये महाराणा प्रताप यांच्यासारखे शौर्य, राजा विक्रमादित्य यांच्यासारखे धैर्य आणि हिंदुत्व बिंबवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. प्रत्येकावर संस्कार करण्याचे कार्य सनातन प्रभात करत आहे, असे कौतुकोद्गार किन्नीगोळी येथील श्रीशक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले. ते कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवानिमित्त मंगळुरू येथील कूटक्कल सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. या वेळी ‘सनातन प्रभात’चे हितचिंतक आणि उद्योजक श्री. मधुसूदन अयार, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सौ. मंजुळा गौडा, तसेच ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. प्रशांत हरिहर हेही व्यासपिठावर उपस्थित होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

प.पू. देवबाबा

कार्यक्रमाला सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी काही वाचक आणि वितरक यांचा सत्कार करण्यात आला. सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे या वेळी श्रीमती अश्‍विनी प्रभु यांनी वाचन केले. हा कार्यक्रम सामाजिक माध्यमांवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला. शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतला.

हिंदूंना आई-वडिलांसारखे मार्गदर्शन करणारे वृत्तपत्र ! – श्री. मधुसूदन अयार

हिंदूंंना धर्माचरणाविषयी असलेल्या शंकांचे निरसन करण्याचे कार्य सनातन प्रभात करत आहे. हिंदूंना आई-वडिलांसारखे मार्गदर्शन करत आहे.

‘सनातन प्रभात’ एक सत्यनिष्ठ नियतकालिक  ! – सौ. मंजुळा गौडा

सौ. मंजुळा  गौडा

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तत्त्वनिष्ठतेने काम करणारे नियतकालिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! गोहत्या, धर्मांतर, हलाल जिहाद अशा हिंदूंवर होणार्‍या अनेक आघातांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य सनातन प्रभात नियतकालिक करत आहे.

‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द समाजात खर्‍या अर्थाने रुजवणारे नियतकालिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! – प्रशांत हरिहर

श्री. प्रशांत हरिहर

आज केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राविषयी चर्चा होत आहे. आजपासून अनुमाने २५ वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारणे म्हणजे एक अघोषित अपराध समजला जायचा. अशा काळात ‘ईश्‍वरी राज्य’, ‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द ज्यांनी समाजात खर्‍या अर्थाने रुजवले, ते नियतकालिक म्हणजे सनातन प्रभात होय. केवळ बातमी नव्हे, तर प्रत्येक बातमीवर दृष्टीकोन देणे, हे सनातन प्रभातचे आगळे वैशिष्ट्यच होय.

उजिरे येथेही साजरा झाला वर्धापनदिन !

उजिरे येथील श्री सीताराम कलामंदिरात २५ फेब्रुवारी या दिवशी कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा सनातन प्रभातचे हितचिंतक डॉ. रवि, सनातन संस्थेचे श्री. आनंद गौडा आणि सनातन प्रभातच्या प्रतिनिधी सौ. शारदा भंडारकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. डॉ. रवि यांनी मार्गदर्शनात सांगितले की, अन्य वृत्तपत्रे आणि सनातन प्रभात यांमध्ये पुष्कळ भेद आहे. सनातन प्रभात ‘ज्ञानाचा सागर’ आहे. त्याद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयीचे विचारधनही प्रसारित केले जाते.