नांदेड येथे काँग्रेसला खिंडार !
नांदेड – माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी २४ फेब्रुवारी या दिवशी भाजप पक्षात प्रवेश केला. खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आय.टी.एम्. महाविद्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या वेळी माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. अनेक जण ‘चव्हाण यांच्यासमवेत जातील’, असा विश्वासही व्यक्त केला जात होता; मात्र काही जणांनी ‘आम्ही काँग्रेससमवेत रहाणार आहोत’, असा दावा केला होता. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर अशोक चव्हाण हे नांदेड येथे आले होते. त्यानंतर त्यांनी समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. सध्या प्रशासक राज असलेल्या महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता होती. महापालिकेतील ८६ पैकी काँग्रेसचे ७७ नगरसेवक होते. मुसलमान समाजातील २३ नगरसेवकांनी मात्र काँग्रेससमवेत रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.